बीड : सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

server down maha e seva kendra

बीड : सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी त्रस्त

जातेगाव : दहावी- बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेली विविध दाखले (प्रमाणपत्र) काढण्यासाठी विद्यार्थ्यांची तर खरीप पीकविमा भरण्या करिता शेतकऱ्यांची महा ई सेवा केंद्रावर गर्दी वाढत आहे. मात्र, सर्व्हर डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांसह, शेतकरी आणि ग्रामीण भागाबरोबरच शहरातील महा ई केंद्र चालक त्रस्त झाले आहेत.

शासनाकडून सर्व प्रमाणपत्रे, दाखले आणि शेतकऱ्यांचा सातबारा वेळेवर मिळावा या हेतूने ऑनलाइन प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. याकरिता शासनाच्या पोर्टलवर कागदपत्र अपलोड करावी लागतात. मागील महिन्यात दहावी-बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विविध दाखले (प्रमाणपत्रे) काढण्यासाठी महा ई सेवा केंद्रावर गर्दी करीत आहेत. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांना दररोजच महा ई सेवा केंद्रात खेटे मारावे लागत आहे. त्यातच आता दोन दिवसांपासून खरीप पीक हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागलेली आहे.

दरम्यान, महा ई सेवा केंद्रावर उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉनक्रिमिलीयर आदी प्रमाणपत्रे ऑनलाइन मिळत असल्याने विद्यार्थ्यांना महा ई सेवा केंद्रातून अर्ज करावा लागतो. यासाठी विविध कागदपत्रे जोडून संबंधित अधिकाऱ्यांच्या पडताळणीनंतर ही प्रमाणपत्रे याच केंद्रावर मिळतात.

विद्यार्थ्यांची विविध दाखल्यांसाठी तर शेतकऱ्यांची पीक विमा भरण्यासाठी गर्दी होत असून, पोर्टलवर ताण येत आहे. कधी सर्व्हर डाऊन होते तर कधी संथ गतीने चालते. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे.

- योगेश पवार, महा ई सेवा केंद्र चालक, जातेगाव

सध्या आमची प्रवेशासाठी धावपळ सुरु आहे. महा ई सेवा केंद्रात शैक्षणिक प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना सर्व्हर डाऊन होत असल्याने पुन्हा-पुन्हा अर्ज करावा लागत आहे.

- दीप सोळंके, विद्यार्थी

Web Title: Beed Maha E Seva Kendra Server Down Farmer Student Documents

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..