
बीड : मेरू पर्वतावर १४ एकर जागेत उभारणार उद्यान
परळी वैजनाथ : शहरातील विद्यानगर भागात उभारण्यात आलेले महात्मा बसवेश्वर उद्यान हे शहराच्या वैभवात भर घालणारे आहे. पण याहीपेक्षा मोठे उद्यान मेरू पर्वतावरील १४ एकर जागेत उभारण्यात येणार असून, त्याठिकाणी ४० फूट उंचीचा महात्मा बसवेश्वर व रेणुकाचार्यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
शहरातील विद्यानगर भागात पंचपीठांची प्रतिकृती असलेले महात्मा बसवेश्वर उद्यान व महात्मा बसवेश्वर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते व डॉ. वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शहरात रस्ते, नाल्या, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, उद्यान निर्मिती या सुविधा पुरविण्याचे कार्य म्हणजे आमचे कर्तव्य आहे. इथल्या सामान्य माणसाचे जीवनमान आर्थिक समृद्धीने उंचवावे, हे आपले ध्येय आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
वैद्यनाथ मंदिरामागील मेरू पर्वत येथे १४ एकर परिसरात विविध औषधोपयोगी वनस्पतींचा समावेश असलेले भव्य उद्यान उभारणार असून, येत्या वर्षभरात प्रत्यक्ष त्याचे काम सुरू होईल. शहराच्या विकासाबरोबरच वैद्यनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्राचे महत्त्व वाढावे यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. तर मेरू पर्वतावर उभारला जाणार पुतळा रंभापुरी पिठातर्फे दिला जाईल असे डॉ. वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामी जाहीर केले.
कार्यक्रम स्थळी डॉ. वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामी (रंभापुरी पीठ), डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, शंभुलिंग शिवाचार्य महाराज, नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, काशीनाथ शिवाचार्य महाराज, चनबसव शिवाचार्य महाराज, गंगाधर महास्वामी, माजी नगराध्यक्ष सरोजिनी हालगे, सोमनाथ हालगे, विजयकुमार मेनकुदळे, डॉ. सुरेश चौधरी, त्रिंबक काटकर, अजय मुंडे, वाल्मिक कराड, चंदूलाल बियाणी, प्रा. मधुकर आघाव, संजय फड, अनिल अष्टेकर, चेतन सौंदळे, सूर्यकांत मुंडे, प्रताप धर्माधिकारी, सुरेश टाक, सुरेखा मेनकुदळे, रमाताई आलदे, प्राजक्ता कराड, भावड्या कराड यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन सौंदळे यांनी केले.
Web Title: Beed Mahatma Basaveshwar Park Statue Inauguration By Dhananjay Munde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..