Beed Market Committee Election : पंकजा मुंडे, संदीप क्षीरसागर यांच्यासमोरची आव्हानं काय? | Latest Marathi News | Pankaja Munde News | Market Committee Election What challenges facing Pankaja Munde Sandeep Kshirsagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beed Market Committee Election

Beed Market Committee Election : पंकजा मुंडे, संदीप क्षीरसागर यांच्यासमोरची आव्हानं काय?

बीड : जिल्ह्यातील १० पैकी नऊ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु झाला असून, पुढच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात मतदान होत आहे. कडा, बीड, गेवराई, पाटोदा बाजार समित्यांमध्ये सत्तांतराचे आव्हान विद्यमान आमदारांवर आहे. तसेच, परळीत पंकजा मुंडे यांनाही सत्तांतर करण्यात यश येते का, हे पहावे लागेल.

जिल्ह्यात एकाच वेळी दहा पैकी नऊ बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहे. साधारण दीड वर्षानी विधानसभा निवडणुका होत आहेत. तर, मागच्या वर्षाच्या अखेरीस ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच पुढे, असा दावा करणाऱ्यांसाठी आता ही निवडणूक ‘आरसा’ ठरणार आहे.

बीड, गेवराई, कडा व परळी या बाजार समित्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. आष्टी- पाटोदा- शिरूर कासार मतदार संघातील कडा व पाटोदा बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत.

मागच्या वेळी विधानसभेला पराभूत झालेल्या सुरेश धस यांनी या दोन्ही बाजार समित्यांवर पुन्हा वर्चस्व मिळविले होते. आता या मतदार संघाचे प्रतिनिधित्व बाळासाहेब आजबे करत आहेत. त्यामुळे त्यांना सत्तांतराचा करिष्मा करता येतो, का हे पाहणे महत्त्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनीही संख्याबळाचा मोठा दावा केलेला आहे.

गेवराई बाजार समिती माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या ताब्यात आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण पवार या ठिकाणचे आमदार आहेत. त्यांना सत्तांतर करण्यात यश मिळते का, हेही पहावे लागणार आहे.

परळीत देखील आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीच्या निवडणुकीत सत्तांतराचे आव्हान भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासमोर आहे. या निवडणुकीतून सेवा सहकारी सोसायट्या व ग्रामंपचायतींवर कोणाचे खरे प्रभुत्व हे कळणार आहे. माजलगावची बाजार समिती आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात असून आता भाजप ही निवडणूक कशी लढणार, हे पहावे लागले.

मागच्या वेळी तत्कालीन आमदार आर. टी. देशमुख यांनी थेट राष्ट्रवादीच्या श्री. सोळंके यांच्याशीच युती केली होती. केज बाजार समितीवर भाजपचे नेते रमेश आडसकर यांचे अनेक वर्षांपासून नेतृत्व आहे. त्यांच्या विरोधात कोण उतरणार हे पहावे लागेल. अंबाजोगाईची बाजार समितीवर मागच्या वेळी राष्ट्रवादीने विजय मिळविला होता. पक्षांतरानंतरही नंदकिशोर मुंदडा यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले.

क्षीरसागरविरुद्ध आघाडीसाठी प्रयत्न

जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या बीड बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व आहे. विधानसभेला जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करणारे पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासमोर सत्तांतराचे मोठे आव्हान आहे. माजी मंत्री क्षीरसागर यांच्या विरोधात राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना, शिवसंग्राम, उद्धव ठाकरे शिवसेना यांचे आघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. आघाडीला आणि आघाडीनंतर सत्तांतराला यश येते का, हे पहावे लागेल.