

Beed Civic Meeting Sparks Political Clash as BJP Alleges Misconduct and Questions Resolutions Passed by Ruling Group
esakal
बीड: दुष्काळाच्या भयानक छायेत होरपळणाऱ्या बीड शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर मंथन करण्यासाठी बोलावलेली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. ०३) नुसता तमाशा आणि रणकंदन ठरली. नागरी सुविधांच्या आढाव्यासाठी आणि दुष्काळी उपायांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेले हे सभागृह पाहून नगर परिषदेची सर्वसाधारण सभा की गावाचा बाजार? असा संतप्त सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. मूळ विषय सोडून मनमानी पद्धतीने विषय रेटून नेण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रतापामुळे सभेत चांगलाच गोंधळ उडाला. या राड्यात महिला लोकप्रतिनिधींचा अवमान झाल्याचा गंभीर आरोप करत भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, भाजप नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.