
गेल्या आठवड्यात पाडळी येथील कावळ्याचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली होती.
शिरूरकासार (जि.बीड) : तालुक्यातील लोणी शिवारात शुक्रवारी (ता.२२) शेतात पाच मोर मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या मोरांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला असल्याचा संसय व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील लोणी येथील शेतकरी येताळा महारनोर व अंबादास केदार यांच्या शेतात ५ मोर मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेनंतर वनविभागाचे वनरक्षक बी.बी. परजने व शिवाजी आघाव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्यानंतर त्यांना पुढील तपासणीसाठी शिरूर येथील पशुवैद्यकीय रूग्णालयात पाठविण्यात आले.
त्यांना पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पशुधनविकास अधिकारी डॉ. प्रदिप आघाव यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात पाडळी येथील कावळ्याचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर २१ कावळे, ३ चिमण्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. दरम्यान तालुक्यातील प्रत्येक गावांत पक्षाची तपासणी करण्यात येत असून ११० पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
Edited - Ganesh Pitekar