Beed : रस्ताप्रश्नी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

movement

Beed : रस्ताप्रश्नी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

माजलगाव : दक्षिणप्रयाग म्हणून राज्यभर ओळख असलेल्या मंजरथ गावचा रस्ता खडतर बनला असून मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता तत्काळ दुरूस्त करावा या मागणीसाठी पॅंथर सेनेच्या वतीने मंजरथ येथे मोबाईल टॉवरवर चढत शोलेस्टाईल आंदोलन सोमवारी (ता. १४) करण्यात आले.

शहरापासून अवघ्या अकरा किमी अंतरावर असलेल्या मंजरथ गावाला ऐतिहासिक वारसा आहे. याठिकाणी असलेल्या पुरातन अशा गोदावरी नदीतीरावर घाट आहे. गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. दक्षिणप्रयाग लक्ष्मी त्रिविक्रम मंदिरासह छोटी - मोठी जवळपास चाळीस मंदिरे याठिकाणी आहेत. तर गोदावरी, सिंदफणा व गुप्त सरस्वती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. दशक्रियाविधीसह इतर धार्मिक विधींसाठी राज्यभरातून शेकडो लोक याठिकाणी येतात. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे माजलगाव ते मंजरथ या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे.

रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांसह व शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याचे दुरुस्त काम तत्काळ सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून होत आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पॅंथर सेनेच्या वतीने मोबाईल टॉवरवर चढत शोलेस्टाईल आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पॅंथर सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष भिमराव कदम, एसएफआयचे तालुका उपाध्यक्ष सोपान ठाकरे, ज्ञानेश्वर वाघमारे, अरुण खुणे, बालचं चुंबळे, अनिल पराडे सहभागी झाले होते.