साडेचार महिन्यांनी क्लिप व्हायरल; बीड दलातील लाचखोर पोलिस निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

  • लाचखोर पोलिसांबाबत एसपी कठोर 
  • पैसे मागितल्याची क्लिप 
  • आठ दिवसांत पाचवा पोलिस निलंबित 

बीड - पोलिस दलातील लाचखोरी रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कठोर भूमिका घेतली असून थोडाही पुरावा हाती आला की तत्काळ निलंबन केले जात आहे. याच भूमिकेमुळे एकाने जानेवारी महिन्यात झालेल्या संभाषणाची क्लिप व्हायरल केली आणि श्री. पोद्दार यांनी पेठबीड ठाण्यातील अर्जुन राख याचे तत्काळ निलंबन केले. आठवडाभरातील हे चौथे निलंबन आहे. 

याच आठवड्यात चेकपोस्टवरून पैसे घेऊन सोडले जात असल्याच्या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी डमी प्रवासी पाठवून खात्री केल्यानंतर पैसे घेतल्याचे उघड झाल्याने तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. तर तीन दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील एकजण वाहन सोडण्यासाठी पैसे मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच त्यालाही निलंबित करण्यात आले.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

पोलिस अधीक्षक लाचखोर पोलिसांबाबत कठोर असल्याचे लक्षात आल्याने एकाने त्याला जानेवारी महिन्यात पोलिस पैसे मागत असल्याची क्लिप व्हायरल केली. प्रतिबंधात्मक कारवाई पोलिस ठाणे वा तहसीलमध्ये केली तर पाच - सहा हजार रुपये लागतील आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविले तर पंधरा हजार रुपये लागतील, असे संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. या क्लिपवरून पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पेठबीड ठाण्यात अर्जुन राख याला निलंबित केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed police suspended