esakal | चार वर्षे, तिच तारीख; धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंकडून सत्ता व्याजासह केली वसूल
sakal

बोलून बातमी शोधा

Dhahnjay Pankaja

२१ मार्च २०१७ ला राष्ट्रवादीच्या दृष्टीक्षेपात असलेली जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात गेली होती. विशेष म्हणजे चार वर्षांनी याच तारखेला राष्ट्रवादीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय मिळविला. वर्षभरापूर्वी झेडपीची सत्ताही ताब्यात घेतली.

चार वर्षे, तिच तारीख; धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंकडून सत्ता व्याजासह केली वसूल

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : सर्वाधिक सदस्य विजयी होऊनही पक्षांतर्गत बंडखोरीमुळे चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या दृष्टीक्षेपात असलेली जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या ताब्यात गेली. पण, चार वर्षांनी धनंजय मुंडेंनी व्याजासह सत्तेची वसूली कर झेडपीत तर पुर्वीच ताब्यात घेतली आणि आता भाजपच्या ताब्यातील जिल्हा बँकेवरही विजय मिळविला.विशेष म्हणजे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निवडही चार वर्षांपूर्वी २१ मार्च २०१७ लाच झाली होती. तर, आता जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचा निकालही दोन दिवसांपूर्वी २१ तारखेलाच लागला. यात राष्ट्रवादी आघाडीने पाच जागा मिळविल्या.


चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या ६० जागांची निवडणुक झाली. धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते तर पंकजा मुंडे राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. या निवडणुकीत भाजपला केवळ २० जागा मिळाल्या. परळी मतदारसंघातही राष्ट्रवादीनेच यश मिळवित जिल्ह्यात २५ जागा मिळविल्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्याच विचाराचे पण आघाडी करुन लढलेले संदीप क्षीरसागर यांनी तीन जागा मिळविल्या. काँग्रेसनेही दोन जागा मिळविल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामनेही चार जागा मिळविल्या होत्या. तत्कालिन परिस्थितीत पंकजा मुंडे व विनायक मेटे यांच्यात राजकीय दुरावाच होता. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या सुरेश धस यांनी बंडखोरी केली, काँग्रेसचा एक गटही भाजपच्या गळाला लागला आणि मेटेंनीही मुंडेंची साथ दिल्याने दृष्टीक्षेपातली राष्ट्रवादीची सत्ता गेली.

त्यानंतर लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची काँग्रेसची जागा धनंजय मुंडे यांच्या आग्रहाने राष्ट्रवादीला मिळाली. त्या बदल्यात हिंगोली - परभणीची हक्काची राष्ट्रवादीची जागा काँग्रेसला सोडावी लागली. इथेही राष्ट्रवादीचा पराभव झाला. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच समीकरणे हळुहळु बदलली. पंकजांचा पराभव झाला आणि भाजपची सत्ताही गेली. धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद आले. यानंतर काही दिवसांनीच झालेल्या जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादीने सत्ता मिळविली आणि भाजपसोबतचा हिशोब चुकता केला. नुकतीच जिल्हा बँकेची निवडणुक झाली.

अनेक वर्षांपासून बँकेवर भाजप आघाडीचीच सत्ता आहे. मात्र, डावपेचांत राष्ट्रवादीने बाजी मारली. सेवा सोसायटी मतदारसंघातील सर्वच उमेदवारी अर्ज बाद झाल्याने ११ मतदारसंघांच्या निवडणुकाच रद्द झाल्या. उर्वरित सात मतदार संघांतील आठ संचालकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेस, शिवसेनेच्या साथीने शेतकरी विकास आघाडी रिंगणात उतरविली. यातही सहा जागा लढविलेल्या आघाडीला पाच जागांवर यश मिळाले. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे महिला मतदारसंघातील परळीच्या भाजप उमेदवाराचा पराभव झाला आणि इथे शिवसेनेच्या उमदेवाराचा अनपेक्षित विजय घडविणण्यातही राष्ट्रवादीला यश आले. दोन्ही निवडणुकांच्या तारखा त्याच असल्या तरी चार वर्षांनी असा राजकीय बदल झाला.

Edited - Ganesh Pitekar