Coronavirus : बीडमध्ये सात तर चिंचपूर येथे दोन नवे रुग्ण, जिल्हा शंभरी पार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

बीड शहरातील सात रुग्णांसह चिंचपूर (ता. धारूर) येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. या नवीन नऊ रुग्णांसह जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १०८ वर पोचला. 

बीड : पुन्हा एकदा बीड शहराला मोठा धक्का बसला. शहरात शनिवारी (ता.२०) नवीन सात कोरोनाग्रस्त आढळल्याने संपर्कातून संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. शहराची रुग्णसंख्या ३३ वर पोचली आहे. शनिवारी पाठविलेल्या ७७ स्वॅबपैकी नऊ स्वॅब नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात बीड शहरातील सात रुग्णांसह चिंचपूर (ता. धारूर) येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. या नवीन नऊ रुग्णांसह जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १०८ वर पोचला. 

शनिवारी बीड येथील कोविड हॉस्पिटलसह बीडचे कोविड केअर सेंटर, आष्टी, केज व परळीचे उपजिल्हा रुग्णालये; तसेच अंबाजोगाईच्या स्वारातीमधील कोविड हॉस्पिटलमधून ७७ स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईच्या विषाणू संशोधन व तपासणी प्रयोगशाळेत पाठविले होते. यातील ६८ स्वॅब नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर नऊ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या नव्या नऊ रुग्णांसह जिल्ह्याचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १०८ वर पोचला आहे. आतापर्यंत चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

कोरोनावर 103 रुपयांची एक गोळी प्रभावी, कंपनीने दिलीय माहिती

शनिवारी असे आढळले कोरोनाग्रस्त 
शनिवारी आढळलेल्या नऊ कोरोनाग्रस्तांमध्ये बीडमधील झमझम कॉलनीतील २१ वर्षीय पुरुष व २२ वर्षीय महिलेसह शहेंशहानगर भागातील २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. बशीरगंज भागात ४० वर्षीय पुरुषासह, ३४ वर्षीय महिला तसेच एक १० व एक सात वर्षांचा मुलगा आहे. चिंचपूर (ता. धारूर) येथे ३१ वर्षीय महिलेसह आठ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. चिंचपूरचे रुग्ण औरंगाबादहून आलेले आहेत. 

बीडमध्ये शहरात संपर्कातून संसर्ग 
सुरवातीला बीड शहरात आढळलेले रुग्ण हे मुंबईहून आलेले होते. त्यानंतर मसरतनगर येथील कुटुंबासह झमझम कॉलनी भागातील एक व्यक्ती हैदराबाद येथून परतले. त्यांच्या संपर्कातून कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या वाढली आहे. या लोकांनी काही समारंभासह सार्वजनिक ठिकाणी हजेऱ्या लावल्या. दरम्यान, आतापर्यंत एकट्या बीड शहराची कोरोनाग्रस्तांची संख्या ३३ वर पोचली आहे. 

‘मास्क’ने थोपवली कोरोनाची दुसरी लाट

पाचजणांसह आतापर्यंत ७८ कोरोनामुक्त 
शनिवारी जिल्हा रुग्णालयातून मसरतनगर (बीड) भागातील एक महिलेसह दोन पुरुष कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, मुंबईत पालकमंत्री मुंडे यांच्यासोबत आढळलेल्या जिल्ह्यातील दोघांनी कोरोनावर मात केली. त्यांनाही डिस्चार्ज मिळाला. असे शनिवारी जिल्ह्यातील पाचजण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. यापूर्वी ७३ जणांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचेही डॉ. थोरात म्हणाले. 
 
सात तालुके कोरोनामुक्त; चार कोरोनाग्रस्त 
सद्यःस्थितीत बीड, केज, परळी व धारूर या तालुक्यांत कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. तर, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, गेवराई, वडवणी, माजलगाव व अंबाजोगाई हे तालुके कोरोनामुक्त आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed reports Nine new coronavirus cases