Beed Shirur kasar taluka 50% sowing
Beed Shirur kasar taluka 50% sowing

बीड : शिरूर तालुक्यात ५० टक्केच पेरणी

२५ हजार हेक्टरवर लागवड : जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम, यंदा तीळ, सूर्यफूल हद्दपार

शिरूर कासार : तालुक्यात यंदा कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून तिंतरवणी, रायमोह मंडळात मध्यम तर शिरूर मंडळात अल्प प्रमाणात पाऊस झाला आहे. याच पावसावर शेतकऱ्यांनी २५ हजार हेक्टरवर पेरणी केली आहे. अद्यापही काही भागातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे तालुक्यात अद्याप पन्नास टक्के पेरणी झाली असून शिरूरकासार, रायमोह व तिंतरवणी या तिन्ही महसूली मंडळात तीळ, सूर्यफूल पिकाची लागवड यंदा झालेली नाही.

तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात मे महिन्यात मॉन्सूनपूर्व अवकाळी पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना शेतीची पूर्व मशागत करता आली नाही. गेल्या हंगामात रोहिणी नक्षत्रात पाऊस झाल्याने शेतातील मशागत झाल्या होत्या. काही प्रमाणात लागवड झाली होती. यंदा हे नक्षत्र कोरडे गेले. त्यातच मृग नक्षत्राच्या दुसऱ्या आठवड्यात मध्यम पाऊस झाला. त्यानंतर रिमझिम तर आर्द्रा नक्षत्रात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी झाला. या पावसात ओढे, नाल्यांसह सिंदफणा, किन्हा नदीला पाणी आले होते. मागील वर्षी (२०२१) खरीपाच्या हंगामात जूनअखेर शिरूर महसूल मंडळात २२८.२५ मिलिमीटर, रायमोह मंडळात २४४ मिलिमीटर तर तिंतरवणी महसूल मंडळात सर्वात कमी १६० मिलिमीटर पाऊस झाला होता.

एकूण तिन्ही मंडळांत जून अखेर ६३२.५ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्या प्रमाणात यंदाच्या (२०२२) जून महिन्याच्या अखेर तिंतरवणी महसुली मंडळात १४८ मिलिमीटर, रायमोह मंडळात ११२, शिरूर मंडळात ८९ मिलिमीटर असा एकूण ३५० मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या खरीपाच्या हंगामापेक्षा यंदा २८२ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे.

या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरणी केली. तालुक्यातील ६४ हजार ४१३ हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ५४ हजार १५३ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रामध्ये जून महिन्याअखेर तालुक्यातील ६ कृषी मंडळात २९ जूनपर्यंत २४ हजार ९८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. यात बाजरी १८१५ हेक्टर, मका १३१ हेक्टर, मुग ४२८ हेक्टर, उडीद ७४४ हेक्टर, भुईमूग १८१ हेक्टर, सोयाबीन १५०० हेक्टर, तूर २०० हेक्टर तर कपाशीची १८ हजार १७७ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. शिरूर कासार, रायमोह व तिंतरवणी या तिन्ही महसूली मंडळात तीळ, सूर्यफूल या पिकांची पेरणी यंदा झालेली नाही. तर यंदा सोयाबीनचा देखील पेरा कमी होऊन कपाशीचे क्षेत्र वाढले आहे.

तालुक्यात पन्नास टक्के पेरणी झाली असून उर्वरित पेरणीची लगबग दिसून येत आहे.यंदा खरिपाच्या हंगामात कृषी विभागाच्या वतीने पेरणीपूर्व बीज प्रक्रिया, वाणाची निवड, बियाणे-खते या संदर्भात गावागावांत बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे रायमोह मंडळाचे कृषी अधिकारी संजय फरताडे यांनी सांगितले.

खरीप पीकपेरणी अहवाल (हेक्टरमध्ये)

कृषी मंडळ झालेली

पेरणी

  • शिरूर कासार : ५१७८

  • गोमळवाडा : ४३४७

  • ब्र.येळंब : २९७२

  • खलापुरी : २८२०

  • रायमोह : ६०६४

  • तिंतरवणी : ३६४९

  • एकूण : २४९८०

तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नसला तरी शेतकऱ्यांनी २५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी केली असून उर्वरित क्षेत्रातही पेरणी सुरू आहे. त्याचा अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त होईल. तालुक्यात अद्याप तूर व सूर्यफुलाची लागवड नाही.

- राजेंद्र नेटके, कृषी अधिकारी, शिरूर कासार

यंदा सोयाबीनची पेरणी कमी करून कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. कारण गेल्या हंगामात कापसाला भाव चांगला आला होता. यामुळे मी शेतात कपाशी लागवड केली आहे.

-बळीराम थिटे, शेतकरी, नांदेवाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com