Beed : शिवसेनेची दुभंगली ताकद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed

Beed : शिवसेनेची दुभंगली ताकद!

बीड : अगोदरच मर्यादित राजकीय ताकद असलेला शिवसेना पक्ष आता दोन पक्षांत (शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना : बाळासाहेब ठाकरे) विभागल्याने जिल्ह्यात या पक्षाच्या ताकदीच्या मर्यादा वाढल्या आहेत. भविष्यात पक्षाची राजकीय ताकद वाढविण्यासाठी दोन्ही शिवसेनांना ताकदवान असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या पक्षांशी लढावे लागणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हक्काचा वाटा पदरात पाडून घेण्यासाठीच हाती मशाल आणि ढाल-तलवार घेऊन मित्रपक्षांशी निकराची लढाई करावी लागणार आहे.एकेकाळी सात विधानसभा मतदार संघ असलेल्या जिल्ह्यात तत्कालीन युतीमध्ये भाजप एका जागेवर तर शिवसेना सहा जागांवर लढायचा. त्यानंतर भाजपने राज्यातील इतर जागा शिवसेनेला देऊन जिल्ह्यातील एकेक जागा पदरात पाडून घेतल्या. त्यानंतर सहा विधानसभा मतदार संघांच्या वाट्यात पाच मतदार संघ भाजपच्या वाट्याला आणि एकमेव बीड मतदार संघ शिवसेनेला असे. त्या काळातदेखील शिवसेनेची राजकीय ताकद मर्यादित असे. मागच्या नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांत पक्षाची कामगिरी फारच सुमार राहिली.

माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यामुळे जिल्हा परिषदेत पक्षाला सत्तेत वाटा भेटला. बीड पंचायत समितीतही कामगिरी बरी राहीली. मात्र, नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत पक्षाची कामगिरी अगदीच सुमार राहिली. आता राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना दुभंगली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अगोदरच मर्यादित राजकीय ताकद असलेल्या पक्षाची ताकद दोन हिश्शांत वाटली गेली. आता जरी एका शिवसेनेला (बाळासाहेब ठाकरे) सत्तेचे ग्लॅमर असले तरी मागच्या नगरपालिका व जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीवेळी पक्ष युतीत व नंतरच्या नगर पंचायत निवडणुकीवेळीदेखील महाविकास आघाडीसोबत राज्यात प्रमुख सत्ताधारी होता. तेव्हाही जिल्ह्यातील निवडणुकांत पक्षाची फारशी चमक दाखविता आली नव्हती. मुळे आता दोन्ही शिवसेनांसमोर आगामी निवडणुकांत राजकीय ताकद दाखविण्याचे मोठे आव्हान आहे.

मित्रपक्षांशीच झुंज

आता महाविकास आघाडीतील शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्ह्यातील मित्रपक्ष राष्ट्रवादी राजकीय ताकदवान आहे. पूर्वीचा मित्रपक्ष भाजपने केवळ बीड व गेवराई मतदार संघात उमेदवाऱ्यांत पुरेसा वाटा दिला होता. इतर ठिकाणी अशीच बोळवण केली होती. आता पक्षाचे जिल्ह्यात चार आमदार आहेत. यात माजलगावला राष्ट्रवादी फार महत्त्व देईल असे चित्र नाही आणि शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची फारशी ताकदही नाही. गेवराईत दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते असलेल्या अमरसिंह पंडित व बदामराव पंडितांमध्ये विस्तव आडवा जात नाही. बीडमध्ये संदीप क्षीरसागरांसोबत स्थानिक शिवसेना नेत्यांचे फारसे बस्तान नाही. परळीत धनंजय मुंडेदेखील फार काही पदरात टाकतील, अशी स्थिती नाही आणि पक्षाची तिकडे फारशी ताकदही नाही.

आष्टीत पक्षाला वाटा घेण्यासाठी अगोदर संघटन दाखवावे लागणार आहे. केज मतदार संघातही पक्षाची वेगळी स्थिती नाही. दुसऱ्या शिवसेनेचा (बाळासाहेब ठाकरे) मित्रपक्ष भाजपदेखील ताकदवान आहे. या शिवसेनेची ताकददेखील मर्यादित आहे. बीडमध्ये योग चांगले की दोन्ही पक्षांना एकमेकांच्या हातात हात घेतल्याशिवाय पर्याय नाही. माजलगावमध्ये वाढू पाहिलेल्या पक्षाला काही तरी मिळू शकते. गेवराई, आष्टी, परळी व केजमध्ये मिन्नतवाऱ्याच कराव्या लागणार आहेत. एकूणच राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करत असले तरी त्यांच्या पक्षाला जिल्ह्यात भाजपकडून वाटा मिळविण्यासाठी विनंतीच करावीच लागणार आहेत.

बीडमध्ये भाजपच कमजोर

युतीमध्ये इतर मतदार संघांपेक्षा बीडची राजकीय स्थिती वेगळी आहे. पूर्वी हा मतदार संघ शिवसेनेचा होता. त्यातच पक्षवाढीपेक्षा क्षीरसागरांना राजकीय अडचण येणार नाही अशीच पक्षातील अनेकांची भूमिका राहायची. त्यामुळे मागची नगरपालिका, जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकांत पक्षाची कामगिरी सुमारच आहे. आताही चित्र फारसे बदलेले नाही. बीड पालिकेच्या नगरसेवकांची संख्या ५० आहे. अपवाद वगळता भाजप बीडमधील बैठका किंवा आंदोलनांतील सहभागींची येवढी संख्या कधी झाली नाही. त्यामुळे बीडमध्ये भाजपकडून वाटा घ्यायला शिवसेनेला (बाळासाहेब ठाकरे) अडचणी येणार नाहीत. उलट शिवसेनेच्या ताकदीपेक्षाही अधिकचा वाटा मिळू शकतो.