
Beed : अध्यापनाची सुरुवात बीडच्या मातीतून
बीड : मराठी साहित्य विश्वात आपल्या नावाचा दबदबा व स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे यशस्वी कुलगुरू असा लौकिक असणाऱ्या डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यापनाची सुरुवात बीडच्या मातीतून झाली होती.
डॉ. कोत्तापल्ले येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करत. साधारण 1980 ते 1987 या सात वर्षांच्या काळात त्यांनी मराठी विषयाचे अध्यापन केल्याची माहिती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांनी दिली. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी डॉ. विजया कोत्तापल्ले देखील याच महाविद्यालयात इतिहासाच्या प्राध्यापिका होत्या.
डॉ. विजया कोत्तापल्ले यांनी 1980 ते 1995 पर्यंत अध्यापन केले. त्या काळात इंग्रजीचे डॉ. राव, हिंदी विषयाचे डॉ. शर्मा व डॉ. बी. एम. पाटोदेकर अशी दिग्गज मंडळी कार्यरत होती. पुढे डॉ. कोत्तापल्ले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. राव अमेरिकेतल्या इंग्रजी विद्यापीठात, डॉ. शर्मा ऑल इंडिया रेडिओत उच्चपदावर आणि डॉ. पाटोदेकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव झाल्याचे डॉ. विवेक मिरगणे यांनी सांगितले. महाविद्यालय तेव्हा गावात होते.
डॉ. कोत्तापल्ले यांचा ज्ञानेश्वरी विषयाचा तास सुरू असताना दुधाचा रतीब घालण्यासाठी शहरात आलेले तास संपेपर्यंत वर्गाबाहेर उभे राहून ऐकत असत, अशी आठवणही डॉ. मिरगणे यांनी सांगितली.
"डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी मराठी साहित्य हे प्रबोधनाचे माध्यम म्हणून निवडले व विवेकवादी विचारसरणीचे लोक घडविले. त्यांना मराठवाड्याची नस कळल्यानेच त्यांनी अभिनव कल्पना राबविता आल्या व ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सर्वांत यशस्वी कुलगुरू ठरले. मराठी साहित्याच्या इतिहासातील दिग्गज अशी डॉ. कोत्तापल्ले यांची ओळख आहे."
- डॉ. विवेक मिरगणे, प्राचार्य, श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड