बीडच्या सीईओंनी घालवली दोन तास कोविड बाधितांसोबत, रुग्णांशी साधला संवाद

Beed CEO Visit Covid Centre
Beed CEO Visit Covid Centre

बीड : कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे आता घरात बसून नाही तर फ्रंटलाईनला खेळून कोरोनाचा मुकाबला करण्याची गरज असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अजित कुंभार यांनी बुधवारी (ता.१९) दाखवून दिले. श्री.कुंभार यांनी दोन तास कोरोनाग्रस्त रुग्णांसोबत घालवत त्यांच्यावरील उपचार, सुविधांची माहिती घेतली. एकेकाळी प्रतिबंधात्मक उपाय योजनांत अव्वल असलेल्या आणि दोन महिने कोरोनाला जिल्ह्याच्या वेशीबाहेर ठेवणाऱ्या जिल्ह्यात आता कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढून तीन हजारांपुढे गेला आहे.

उपचार घेणाऱ्यांची संख्याही साडेचौदाशेंवर गेली आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणेकडील अपुरे मनुष्यबळ, वाढत्या संख्येमुळे उपचारासह इतर त्रुटी आहेतच. मात्र, रुग्णांनाही धीर मिळावा आणि यंत्रणेतील त्रुटी असतील, तर त्याही दुर करता याव्यात या दिशेने बुधवारी श्री.कुंभार सर्वाधिक रुग्ण उपचार घेत असलेल्या जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात दाखल झाले. पीपीई किट घालून त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.संजय राऊत व डॉ.अभिमान जाधव यांच्यासह सहाही वॉर्डात जाऊन पाहणी केली.

रुग्णांशी संवाद साधून उपचार वेळेवर भेटतात का, तपासणी होते का अशी विचारपूस करुन घाबरु नका, तुम्ही दुरुस्त होणार असा धीरही वृद्ध रुग्णांना दिला. विशेष म्हणजे त्यांनी स्वच्छतागृहांची देखील पाहणी केली. त्यांनी यावेळी या वॉर्डमध्ये नियुक्त असलेल्या डॉक्टरांसह कर्मचारी परिचारिका, वॉर्डबॉय यांच्याशीही संवाद साधून माहिती आणि त्यांच्याही अडचणी जाणून घेतल्या. श्री.कुंभार यांच्या भेटीमुळे रुग्णांनाही धीर भेटला. तसेच, यंत्रणेतील त्रुटी आणि इथे काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्याही समस्या या निमित्ताने समोर आल्या.

त्यामुळे आता त्या दूर करण्यास मदत होणार आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या काळात श्री.कुंभार यांनी जिल्हा परिषदेची यंत्रणा तगडबंद केली. आठवडे बाजार भरलेल्या गावांतील ग्रामसेवक-सरपंचांवर कारवाया आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांचे थेट निलंबन करणाऱ्या श्री.कुंभार यांनी कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांचा प्रशस्तीपत्र देऊनही गौरव केला. यंत्रणेवर वचक ठेवतानाच त्यांनी अनेकवेळा अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रामधील भागांत पाहणी, नागरिकांशी संवाद, जलद अँटिजेन चाचणी मोहिमस्थळी जाऊन थांबून यंत्रणा कामाला लावली.

आज तर चक्क दोन तास कोरोना वॉर्डात घालवला. रुग्णांच्या व सुविधांची माहिती जाणून घेतानाच प्रत्यक्ष पीपीई किट घातल्यानंतर डॉक्टरांनाही किती जिकरीचे होते याचाही अनुभव त्यांनी घेतला. रुग्णांनी उपचार चांगले मिळत असल्याचे सांगितल्याने समाधान वाटल्याचे श्री.कुंभार म्हणाले. मनुष्यबळाची अडचण आहेच ती सोडविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.


रुग्णांवरील उपचार व सुविधांची पाहणी केली. रुग्णांनी उपचार चांगले मिळत असल्याचे सांगितल्याने समाधान वाटले. मनुष्यबळाची अडचण आहेच ती सोडविण्याचा प्रयत्न आहे. यापुढेही कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालयांना नित्याने भेटी देणार आहे.
- अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com