नांदेडकरांनो सावधान...! सोने उजळून घेताय...

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

शहरातील एका महिलेपासून चार सोन्याच्या पाटल्या घेऊन हे भामटे पसार झाले. ही घटना कैलासनगर भागातील पोस्टल कॉलनीत बुधवारी (ता. ११) दुपारी तीन वाजता घडली. 

नांदेड : ‘हम पीतळ और तांबे के बर्तन उजालकर साफ करके देते है’ असे म्हणून एका महिलेला चक्क एक लाख २० हजाराचा फटका दिला. या महिलेपासून चार सोन्याच्या पाटल्या घेऊन हे भामटे पसार झाले. ही घटना शहराच्या कैलासनगर भागातील पोस्टल कॉलनीत बुधवारी (ता. ११) दुपारी तीन वाजता घडली. 

शहराच्या कैलासनगरमधील पोस्टल कॉलनीत राहणाऱ्या जेष्ठ नागरिक शशिकला नरसिंह जोशी (वय ७०) ह्या आपल्या पतीसोबत घरात बसल्या होत्या. यावेळी त्यांच्या अंगणात दोन भामटे तरूण आले. ‘हम पीतळ और तांबे के बर्तन उजालकर साफ करके देते है’ असे सांगितले. यावेळी त्यांना आपल्या अंगणात बसवून एक तांब्याची मुर्ती व एक चांदीची मुर्ती त्यांनी उजळून दिली. ह्या दोन मुर्ती उजळून देत असतांना या महिलेस त्यांनी विश्‍वासात घेतले. घरातील अन्य वस्तुही साफ करून घ्या असे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर तुमच्या हातातील सोन्याच्या पाटल्या (बांगड्या) किती खराब दिसत आहेत. त्याही उजाळून देतो. असे विश्‍वासात घेऊन त्यांंच्याकडे असलेल्या एक लाख २० हजार रुपये किंमतीच्या चार सोन्याच्या पाटल्या काढून घेतल्या. 

हेही वाचा --‘येथील’ सोनसाखळी चोरांना ‘अच्छे’ दिन

सोन्याच्या बांगड्या घेऊन भामटे पसार 

श्रीमती जोशी यांची नजर चुकवून त्यांनी एका कापडाची गाठ बांधून त्यांच्या हातात दिली. तसेच लाल रंगाची पावडर त्यांच्या हातावर दिली. घरात जावून गॅसवर एका भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवा. त्यात ही पावडर व बांधलेले कापड गरम पाण्यात टाका. दहा मिनीटानी बाहेर काढल्यानंतर त्या चकाचक होतात असे सांगितले. दहा मिनीटानंतर ही महिला घरात जावून बाहेर येईपर्यंत हे भामटे पसार झाले. कापडाची गाठ सोडून बघितली तर आत काहीच नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

आपली फसगत झाल्याचे समजताच त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. यामुळे पोलिसही चक्रावून गेले. माहीत मिळताच पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी या प्रकरणात सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर शशिकला जोशी यांच्या फिर्यादीवरून दोन भामट्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत.

ही लिंक उघडा--‘या’ कायद्याचा असाही होतोय दुरुपयोग

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

असे भामटे आपल्या घरासमोर आले तर त्यांना कामात व्यस्त ठेवून आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच सोने किंवा चांदी उजाळून घ्यायचीच असेल तर रितसर सराफा दुकानात जावे व अशा आमिषाला बळी पडू नका असे आवाहन भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुध्द काकडे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware of Nandedkar ...! Brightening Gold ..