उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्राचा आधारवड हरपला, भगवानसिंह बयास यांचे निधन

Bhagwansinh Bayas
Bhagwansinh Bayas

उदगीर (जि.लातूर) : येथील आदर्श शिक्षक भगवानसिंह बयास गुरुजी (वय ८४) यांचे बुधवारी (ता.१९) सकाळच्या सुमारास अल्पशा आजाराने नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर नांदेड येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रात भगवानसिंह बयास गुरुजी यांचे मोठे नाव आहे. उदगीरात अनेक वर्षे इंग्रजी विषयाची मोफत शिकवणी घेऊन हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पिढ्या घडविणारे गुरुजी म्हणून त्यांची ओळख आहे.
श्री.बयास गुरुजी यांचे अहमदपूर तालुक्यातील कुमठा हे मूळगाव.

उदगीरच्या नामांकित विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. शाळेतील शिक्षणाबरोबरच अनेक वर्ष त्यांनी मोफत शिकवणी घेऊन विद्यार्थ्यांना शिकवले. ते घरी शिकवणी घेत पण विद्यार्थ्यांकडून त्याचे शुल्क घेतले जात नाही. त्यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थी गुरुजींकडे मोफत शिकले. उदगीर शहराचे आणि परिसराचे ते गुरुजी झाले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी शैक्षणिक, सामाजिक कार्य सुरुच ठेवले. गुरुजींच्या हातून अनेक पिढ्या घडल्या आहेत. अनेक शैक्षणिक संस्थांचे गुरुजी पदाधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी,  दोन मुले , सुना व नातवंडे असा परिवार आहे.

शिक्षण क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व, गोरगरिबांच्या लेकरांचे वाली, आपल्या अध्यापनाने पंचक्रोषीत नावलौकिक प्राप्त झालेले बयास गुरूजी यांच्या निधनाने उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रासह सर्वत्र शोककळा पसरली आहे. ते बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ, अहमदपूर या नामांकित संस्थेचे उपाध्यक्ष होते. उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ.दत्तात्रेय पाटील आणि सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, रेफील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, सचिव प्रा.मनोहर पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य आर.एन.जाधव, पर्यवेक्षक सी.एम.भद्रे आदी उपस्थित होते.
 

(संपादन : गणेश पिटेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com