esakal | 'प्रामाणिकपणाने भावाला उंचीवर नेले'; डॉ. कराडांच्या भगिनीचे मनोगत
sakal

बोलून बातमी शोधा

latur

'प्रामाणिकपणाने भावाला उंचीवर नेले'; डॉ. कराडांच्या भगिनीचे मनोगत

sakal_logo
By
हरि तुगावकर

लातूर: ‘चिखली (ता. अहमदपूर) सारख्या छोट्या गावातून माझे मोठे बंधू मोठे झाले. आमचे शेतकऱ्याचे कुटुंब. डॉ. भागवत हे थोरले भाऊ. त्यांनी बालपणापासून आम्हा सर्वांनाच सावरले व प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी बळ दिले. नात्यासोबत सामाजिक कार्यातील त्यांचा प्रामाणिकपणा आज त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आहे. बहीण म्हणून याचा मला मोठा अभिमान आहे. माझ्यासाठी व माझ्या कुटुंबांसाठी आयुष्यातील आजचा दिवस सोन्याचा आहे.’

केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या डॉ. भागवत कराड यांच्या भगिनी डॉ. दीपा गीते यांना ‘सकाळ’शी संवाद साधताना गहिवरून आले. त्या म्हणाल्या, भागवत यांना शिक्षणाची आवड होती. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण चिखलीत झाले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी अंधोरी (ता. अहमदपूर) येथे तर महाविद्यालयीन शिक्षण अहमदपूर येथील महात्मा गांधी विद्यालयात घेतले. डॉक्टर होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ते साध्यही केले. औरंगाबाद येथून त्यांनी एमबीबीएसची पदवी घेतली. मुंबईतून त्यांनी एमसीएचची पदवी घेतली. मराठवाड्यातील ते पहिले बाल शल्यचिकित्सक झाले. औरंगाबाद येथे आरोग्यसेवा बजावत असताना त्यांनी भावंडांना उच्चशिक्षित केले. औरंगाबादमध्ये काम करीत असताना ते राजकारणात आले. नगरसेवक, उपमहापौर तसेच दोन वेळा ते महापौर बनले. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे ते अध्यक्षही राहिले.

हेही वाचा: लातूरात अनेक भागांत दमदार पाऊस, पिकांसह शेतकऱ्यांचे चेहरे टवटवीत

कार्यरत राहणे हा स्वभाव
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते खंदे समर्थक. राजकारणासोबतच समाजकारणात त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली़; पण गर्व कधीच केला नाही. काम करीत राहणे हा त्यांचा स्वभाव आहे. काम केले की त्याची कोणी तरी दखल घेत असते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात भागवत यांची निवड होणे ही त्यांच्या आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केलेल्याची पावतीच आहे. आमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. आज एका शेतकऱ्याचा मुलगा केंद्रीय मंत्री झाला याचा बहीण म्हणून मोठा अभिमान आहे, असेही डॉ. दीपा गीते म्हणाल्या.

loading image