esakal | लातूरात अनेक भागांत दमदार पाऊस, पिकांसह शेतकऱ्यांचे चेहरे टवटवीत
sakal

बोलून बातमी शोधा

latur

लातूरात अनेक भागांत दमदार पाऊस, पिकांसह शेतकऱ्यांचे चेहरे टवटवीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: जिल्ह्यातील अनेक भागांत बुधवारी (ता. आठ) दमदार पाऊस झाला. त्यामुळे कोमेजत असलेल्या पिकांसह चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांचे चेहरेही टवटवीत झाले. दरम्यान, आता मशागतीच्या कामांना या पावसामुळे गती येणार आहे.

हेरमध्ये रात्रभर भीजपाऊस
हेर : परिसरात बुधवारी रात्रभर भीज पाऊस पडला. त्यामुळे पिके टवटवीत झाली असून, मशागतीच्या कामांना गती येणार आहे. हेर मंडळात ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिसरातील करडखेल, कुमठा खुर्द, वायगाव, भाकसखेडा, लोहारा, नरसिंग वाडी, सताळा, शंभू उमरगा, डिग्रस बामाजीची, वाडी आदी भागात बुधवारी दुपारी चारपासून ढगाळ वातावरण तयार झाले. चारच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. रात्रभर पावसाच्या सरी बरसत राहिल्या. वादळी वाऱ्यामुळे हेर परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडित होता. त्यामुळे परिसरातील जनतेला याचा त्रास सहन करावा लागला. या पावसाने परिसरातील शेतकरी समाधानी झाले आहेत.

जळकोट तालुक्यात सहा तास रिमझिम
जळकोट ः तालुक्यात रात्री बारा ते सकाळी सहा वाजतापर्यंत रिमझिम पाऊस झाला. तालुक्यातील खरिपाची नव्वद टक्के पेरणी झालेली आहे. पिकांची उगवणही चांगल्या प्रकारे झाली. अनेक शेतकऱ्यांनी दोन कोळपणी केली. पण, पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत होते. अंकुरलेली पिके कोमेजून जात होती. दरम्यान, बुधवारी रात्री रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत ओल झाली. माना टाकत असलेले पीक उभे होऊन डोलू लागले. आहे.

नळेगावात मुसळधार
नळेगाव : परिसरात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल प्रशासनाकडून नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यात आली. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अजूनपर्यंत पीक विमा भरणे चालू आहे. काही क्षेत्रावर पेरणी होणे बाकी आहे. अशातच पावसाने जोराचा तडाका दिल्यामुळे तीनही शिवारातील शेतजमिनीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याचे संरक्षण मिळाले नाही. त्या शेतकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पंचनामे करून त्वरित मदत मिळणे गरजेचे आहे.

हेही वाचा: 'पाण्याचे नियोजन करा अन्यथा आयुक्तांच्या घराची नळजोडणी तोडू'; मनसेचा इशारा

यावर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी लगबगीने उरकली होती. पेरणीनंतर १५ दिवस पावसाने उघडीप दिली. त्यामुळे कोवळी पिके सुकू लागली होती. मात्र, तीन दिवसांत नळेगाव, लिंबाळवाडी व देवंग्रा शिवारात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढा, नाल्यांचे पाणी शेतात घुसल्याने पीक व शेतातील माती वाहून गेली आहे.

loading image