Bharat Jodo Yatra : पदयात्रा नव्हे; हे आंदोलन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra : पदयात्रा नव्हे; हे आंदोलन!

कळमनुरी : ही केवळ काँग्रेसची पदयात्रा नाही. धर्मांध, मूलतत्त्ववादी सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांचे हे आंदोलन आहे. विरोधी पक्ष या नात्याने त्याचे नेतृत्व फक्त काँग्रेसकडे आहे, अशी भावना व्यक्त केली ते भारत जोडो यात्रेत देगलूरपासून चालत असलेल्या ज्येष्ठांनी.

अण्णांच्याही आंदोलनात सहभाग

सविता कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्त्या, पुणे) ः मी काँग्रेसची समर्थक नाही. ज्यावेळी तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलन केले होते, त्यावेळीही माझा सक्रिय सहभाग होता. त्याचा फायदा भाजपला झाला. काँग्रेस सरकार गेले याचा आनंदच झाला. पण, या आठ वर्षांत भाजपनेही आमची घोर निराशा केली. महागाई, बेरोजगारीचे समजू शकते. पण, धर्मांत भेद करणारे राजकारण खूप धोकादायक आहे. या धर्मांधपणाच्या विरोधात हे आंदोलन आहे. भविष्यात काँग्रेस सत्तेत आला आणि असेच सुरू राहिले तर काँग्रेस विरोधातही रस्त्यावर उतरणार. चालताना शंकरनगरजवळ (जि. नांदेड) पायातून रक्त येत होते. कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेत बसवले. डॉक्टरांनी त्वरित उपचार केले. थकवा अजिबात जाणवत नाही. मध्यप्रदेशाच्या सीमेपर्यंत चालणार आहे.

पुढच्या पिढीसाठी चालतोय

डॉ. विमल भोनोट (निवृत्त प्राध्यापक) ः माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी पंजाबचा आहे. देगलूरपासून चालत आहे. हे वय इतके दूर चालण्याचे नसले तरी पुढच्या पिढीसाठी चालत आहे. आज जर आपण चाललो नाही तर भविष्यात भारताची अवस्था अफगाणिस्तानसारखी होईल. त्यावेळी तेव्हाची पिढी आम्हाला दोष देईल. वय जास्त असल्याने चालताना त्रास होतो, पण, तरीही चालणार आहे. सायंकाळी निवासाच्या ठिकाणी अनोळखी मुले आस्थेने चौकशी करतात. काळजी घेतात. त्यामुळे रक्ताचे नसले तरी या ठिकाणी विचाराने जोडलेले माझे अनेक नातेवाईक आहेत. त्यांचे प्रेम चालण्याचे बळ देत आहे.

समाजाला निरोगी करण्यासाठी..

सुशीला मोराळे (निवृत्त प्राध्यापक, बीड) ः ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. तित सहभागी व्हावे, असे वाटले, म्हणून आले. सुरवातीला देगलूरपासून ते शंकरनगरपर्यंतच (जि. नांदेड) असे १०-१५ किलोमीटरच चालण्याचे ठरवले होते. पण, चालत-चालत हिंगोली जिल्ह्यात पोचले. ही ऊर्जा कुठून आली, हे कळत नाही. शक्य आहे; तोपर्यंत चालणार. चालताना काहीही त्रास झाला नाही. उलट आरोग्याला फायदा तर होणारच आहे. समाजालाही निरोगी करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.