Bharat Jodo Yatra : जल्लोषात ‘भारत जोडो’चे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli

Bharat Jodo Yatra : जल्लोषात ‘भारत जोडो’चे स्वागत

हिंगोली : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड येथून जिल्ह्यातील हिवरा/चोरंबा फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी दाखल झाली. यावेळी परिसरातील गावकऱ्यांनी स्व. खासदार राजीव सातव यांचे मित्र म्हणून ओळखले जाणारे राहुल गांधी यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शुक्रवारी जिल्ह्यात दाखल झाली आहे. या यात्रेचे हिवरा/चोरंबा फाटा येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कोल्हापूर येथील लेझीम पथक, झांज पथकाने व कोल्हापूर येथील ढोल- ताशा पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधले होते. तसेच गोंधळ कलावंतही सहभागी झाले आहे.

हिवरा फाटा परिसरात असलेल्या हिवरा, वरुड, वरुडतांडा, डोंगरकडा, भाटेगाव, जामगव्हाण, महालिंगी, महालिंगी तांडा, सुकळीवीर, झुनझुनवाडीसह परिसरात येणाऱ्या गावातील गावकऱ्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, राहुल गांधी हे स्व. राजीव सातव यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांच्या यंग बिग्रेडमध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. राहुल गांधींचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे राजीव सातव २००८ मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक जिंकली.

त्याच्या पुढल्याच वर्षी म्हणजे २०१० मध्ये त्यांच्याकडे युवा काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी सोपवण्यात आली. तब्बल चार वर्षे ते राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. त्यामुळे त्यांची राहुल गांधींशी जवळीक वाढली आणि ते राहुल ब्रिगेडच्या प्रमुख सदस्यांपैकी एक झाले होते. मोदीच्या लाटेत २०१४ साली मराठवाड्यात केवळ दोनच खासदार निवडून आले होते आणि त्यातील एक राजीव सातव होते.

यामुळे हिंगोली जिल्ह्यात स्व. राजीव सातव व राहुल गांधी यांची मैत्री परिचित आहे. यामुळे राहुल गांधींना पाहण्यासाठी परिसरातील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी राहुल गांधी यांना राजीव सातव यांची आठवण येणार असून, जागोजागी लागलेली त्यांचे होर्डिंग, बॅनर व त्यावर असलेले संदेश भावनिक आहेत.

भारत जोडो यात्रा आज बाळापूरमध्ये

हिंगोली: काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा जिल्ह्यात दाखल झाली आहे. शनिवारी कळमनुरी तालुक्यातील शेवाळा पेट्रोल पंप येथून सकाळी ६.३० वाजता यात्रा पुढील प्रवासास निघणार आहे. आखाडा बाळापूर येथे यात्रेचे स्वागत होणार आहे. त्यानंतर आराटी शिवारातील लक्ष्मी पेट्रोल पंप येथे दुपारी ४.३० वाजता यात्रा थोडावेळ थांबून पुढील प्रवास करणार आहे. कळमनुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर ७.३० वाजता कॉर्नर सभा होणार आहे.