कळमनुरी तालुक्यातील भुरक्याचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध, गावकऱ्यांनी ठराव घेऊन निवडले सदस्य

संजय कापसे
Monday, 21 December 2020

तालुक्यातील भुरक्याची वाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा ठराव रविवार (ता. २०) गावकऱ्यांच्या बैठकीत घेतला. या बैठकीत सर्वानुमते गावामधून निवडून देणाऱ्या सात सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली.

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर निवडणुका होणाऱ्या प्रत्येक गावांमधून राजकीय वातावरण तापले असतानाच गावांमध्ये आपापसात मतभेद व वाद होणार नाहीत याची वयस्कर मंडळींनी काळजी घेत पक्षांतर्गत राजकारण बाजूला ठेवून तालुक्यातील भुरक्याची वाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा ठराव रविवार (ता. २०) गावकऱ्यांच्या बैठकीत घेतला. या बैठकीत सर्वानुमते गावामधून निवडून देणाऱ्या सात सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली.

तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी गाव असलेल्या भुरक्याचीवाडी गावाची लोकसंख्या जवळपास सतराशे एवढी आहे. गावातील बहुतांश नागरिकांचा आपआपसात नातेवाईक, पाहुणे मंडळी असा गोतावळा आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावामध्ये पक्षीय राजकारण निवडणुकीत होणारे वाद व मतभेद टाळण्यासाठी या वेळेस होणारी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी असा विचार गावातील ज्येष्ठ मंडळी व ग्रामपंचायतच्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी गावातील मंडळीसमोर मांडला. या विचाराला गावातील बहुतांश मंडळींनी पाठिंबा दर्शविला. त्यानंतर रविवारी गावातील मंदिराच्या सभागृहात माजी सरपंच संतोष भुरके, सुदाम खोकले ,जगदेव भुरके, लक्ष्मण खोकले, तुकाराम माहोरे, हारजी खंदारे, हनुमान वानोळे, गणपत वानोळे, यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील महिला व नागरिकांची बैठक घेण्यात आली.

हेही वाचा - हिंगोली : वाढलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे सुका मेव्याची मागणी वाढली

बैठकीत माजी सरपंच संतोष भुरके यांनी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी गावांमध्ये वाद- विवाद व पक्षाचे राजकारण नको म्हणून गावातून ग्रामपंचायतीचे सर्व सात सदस्य बिनविरोध निवडून देत ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा विषय मांडला. या विषयाला उपस्थित महिला व नागरिकांनी पाठिंबा देत ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी एकमुखी ठराव घेतला. यामध्ये भुरक्याचीवाडी ग्रामपंचायतसाठी तीन वार्डमधून निवडून द्यावयाच्या सात सदस्यांकरिता गावकऱ्यांची नवनिर्वाचित सात सदस्यांची एकमताने निवडही केली. ही निवड करताना गावकऱ्यांनी राजकारण विरहित गावचा विकास करु शकणाऱ्या युवकांना संधी दिली आहे. यामध्ये राधाबाई तुकाराम माहोरे, सविता नारायण वानोळे, द्वारका भारत गोरे, कैलास खोकले, विनायक कुरुडे, ज्ञानेश्वर आमले, प्रल्हाद भुरके यांची सदस्य म्हणून निवड केली आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात निवड केलेले सातही जण एकत्रितपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय गावांमधून इतर कोणीही उमेदवारी दाखल करणार नसल्यामुळे ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडली जाणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षीय राजकारण, मतभेद, वाद होणार नाहीत या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत बिनविरोध निवडीचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे यामधून गावकऱ्यांनी बिनविरोधपणे युवकांच्या हाती ग्रामपंचायत सोपवली आहे. त्यांनी एकमेकात समन्वय राखत गावचा विकास करावा असे आवाहन केले.
- लक्ष्मणराव खोकले, माजी सरपंच, भुरक्याचीवाडी

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhurakyachiwadi Gram Panchayat in Kalamanuri taluka was elected unopposed by the villagers hingoli news