Vidhan Sabha 2019 : 'औरंगाबाद मध्य'मधून भाजपच्या तनवाणींचीही माघार

माधव सावरगावे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार किशनचंद तनवाणी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

औरंगाबाद : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार किशनचंद तनवाणी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मत विभाजनामुळे एमआयएमच्या उमेदवारांचा विजय झाला होता. तो यावेळी होऊ नये आणि युतीचाच उमेदवार विजयी व्हावा, यासाठी मी माघार घेतली असल्याची प्रतिक्रिया किशनचंद तनवाणी यांनी दिली आहे. 

किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली असल्याने शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांचा मार्ग सुकर झाला आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे शहराध्यक्ष असलेले किशनचंद तनवाणी यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या मतदारसंघांमध्ये किशनचंद तनवाणी यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होईल हे स्पष्ट होते. शिवाय २०१४ मधील विधानसभेतले विभाजन पाहता एमआयएमला पुन्हा संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू झाली होती. 

गेल्या दोन दिवसांपासून किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी स्वतः उमेदवार असलेले प्रदीप जयस्वाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे प्रयत्न सुरू ठेवले होते. त्या प्रयत्नाला आता यश आले आहे. आज दुपारी प्रदीप जयस्वाल आणि किशनचंद तनवाणी या दोघांनी एकत्र जाऊनच तनवाणी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. तनवाणी यांनी आपली दोस्ती निभावल्याची चर्चा तिथून सुरू झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader Kishanchand Tanwani withdraws his nomination form from aurangabad