भाजपकडे गुजरातची निरमा पावडर; रावसाहेब दानवेंचा विरोधकांना टोला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

महजनादेश यात्रा जालन्यात असताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘भाजपकडे खरचं वॉशिंग मशीन आहे. पक्षात प्रवेश करून घेण्यापूर्वी आम्ही प्रत्येकाला त्या मशीनमध्ये धुवून काढतो. आमच्याकडे गुजरातची नीरमा पावडर आहे.’ 

जालना : सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे. त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सडकून टीका करत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते कसे काय शुद्ध होतात?, असा टोला विरोधकांकडून लगावला जातोय. त्याला भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दावने यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाजनादेश यात्रे दरम्यान मंत्री दानवे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रती टोला लगावला आहे. महजनादेश यात्रा जालन्यात असताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘भाजपकडे खरचं वॉशिंग मशीन आहे. पक्षात प्रवेश करून घेण्यापूर्वी आम्ही प्रत्येकाला त्या मशीनमध्ये धुवून काढतो. आमच्याकडे गुजरातची नीरमा पावडर आहे.’ 

मुख्यमंत्री म्हणतात, ‘विरोधकांच्या डोक्यात बिघाड’
महाजनादेश यात्रा फुलंब्री, सिल्लोड, भोकरदन आणि जालन्यात होती. तेथे यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यात्रे दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य केले. सध्या विरोधत ईव्हीएमवर संशय घेत आहेत. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘विरोधक नेहमीच ईव्हीएमवरून आक्रमक होत आहेत. पण, ईव्हीएममध्ये बिघाड नसून, विरोधकांच्या डोक्यात बिघाड झाला आहे. पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना, ईव्हीएम चांगले होते. आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मात्र ईव्हीएममध्ये बिघाड कसा होऊ शकतो? सुप्रिया सुळे निवडून आल्या तेथे ईव्हीएम चांगले आणि रावसाहेब निवडून आले तर, ईव्हीएममध्ये बिघाड, असे कसे होईल. भाजपचे उमेदवार तेल लावून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीला उमेदवार मिळेना झाले आहेत. ज्या पक्षाच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिला. त्या पक्षाची आणखी दुर्दशा काय असू शकते? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या यात्रा सुरू आहेत. पण, त्याला प्रतिसाद नसल्यामुळे त्या मंगल कार्यालयात आयोजित केल्या जात आहेत.’

‘भोकरदनची सभा शुभ’
भोकरदची जाहीर सभा शुभ असते असा दावा मुख्यमंत्री फडवणीस यांनी यावेळी केला. ते म्हणाले, ‘भोकरदन हा रावसाहेब दानवेंचा गड असली तरी, येथे जनादेश यात्रा घेण्याची दोन कारणे आहेत. भोकरदन येथील सभा शुभ मानली जाते. २०१४मध्ये मी येथे संघर्ष यात्रेदरम्यान सभा घेतली तेव्हा तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला खाली खेचण्याचे आवाहन केले होते आणि युतीची सत्ता आली. दुसरे कारण म्हणजे, दानवे पूत्र संतोष दानवे यांना तुम्ही विक्रमी मतांनी निवडून देणार? हे विचारण्यासाठी येथे महाजनादेश यात्रेची सभा घेतली आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Raosaheb Danve criticized oppositions