परभणीतील भाजप नेत्यांचे प्रदेशावरील वजन घटले, का ते वाचा...

गणेश पांडे
शनिवार, 4 जुलै 2020

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निवडी शुक्रवारी झाल्या, खऱ्या पण त्यात प्रदेश कार्यकारिणीत पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे वजन घटले आहे. हे झालेल्या निवडीवरुन स्पष्ट होते. 

परभणी : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या निवडी शुक्रवारी करण्यात आल्या. परंतू, या निवडीनंतर जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे प्रदेशावरील वजन घटल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत बिनकामाच्या पदावरच जिल्ह्यातील भाजप नेत्यांची बोळवण केल्याचे दिसून आले आहे.

भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील कार्यकारिणी शुक्रवारी (ता.तीन) सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकारिणी जाहीर केली. परंतू, प्रदेशपातळीवरील या पदाधिकाऱ्यांत परभणी जिल्ह्याच्या एकाही पुढाऱ्यांचा समावेश झाला नाही. कार्यकारणीत याशिवाय सात प्रमुख आघाड्या जाहीर झाल्या आहेत. त्याचे अध्यक्षही जाहीर केल्या गेले आहेत. पक्षाचे प्रदेश कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख घोषित झाले आहेत. परंतू, त्यात सुध्दा या जिल्ह्यातील एकाही नेत्याची वर्णी लावण्यात आलेली नाही. 

हेही वाचा - अर्जापूरच्या युवकाचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायीच, कसा? ते वाचलेच पाहिजे

एकाही नेत्याला मोठी पदे किंवा जबाबदारी नाही 

राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. परंतू, या जिल्ह्याच्या एकाही नेत्यांचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे व माजी जिल्हाध्यक्ष अभय चाटे या दोघांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. निमंत्रित सदस्य म्हणून माजी आमदार ॲड. विजय गव्हाणे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, डॉ.अनिल कांबळे, जिल्हा परिषद सदस्य गणेशराव रोकडे, माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे तर महानगरातून मोहन कुलकर्णी निवड करण्यात आली आहे. परंतू, वरिष्ठ पातळीवरील समितीत यापैकी एकाही नेत्याला मोठी पदे किंवा जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही. परंतू, ही पदे नावापुरती असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - अवैध देशी, विदेशी, ताडीसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त-  निलेश सांगडे

यंदा जिल्ह्याला झुकते माप दिले ः डॉ. सुभाष कदम
भाजपच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची संख्याही कमी असते. त्यामुळे यात पद मिळणे कठीण जाते. परंतू, भौगोलिक व सामाजिक समतोल साधून साधून त्या - त्या जिल्ह्याला पदे दिली जातात. त्यात ३० टक्के महिला पदाधिकाऱ्यांसाठी राखीव जागा ठेवल्या जातात. परंतू, गतवेळी पेक्षा यंदा परभणी जिल्ह्याला पक्षाने झुकते माप दिले आहे. त्यात महानगरमधील तीन व ग्रामीणमधील सहा जणांना पदे दिली आहेत. हे जिल्ह्यासाठी झुकते माप असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांनी सांगितले.

गणेश पांडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leaders in Parbhani lost weight in the region, read why ....parbhani news