लातूरच्या पालकमंत्र्यांचा सत्कार होऊ देणार नाही, भाजप आक्रमक

लातूरच्या पालकमंत्र्यांचा सत्कार होऊ देणार नाही, भाजप आक्रमक

लातूर ः शहरात उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहास अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर असताना नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पहिला ठराव रद्द करत या नाट्यगृहास श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी हा ठराव तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा प्रजासत्ताकदिनी रविवारी (ता.26) होणारा पालकमंत्र्यांचा नागरी सत्काराचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा भाजपच्या वतीने बुधवारी (ता.22) झालेल्या बैठकीत देण्यात आला.

याविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
शहरात नाट्यगृहाचे बांधकाम सुरू आहे. नाट्यगृहाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. जागेअभावी नाट्यगृहाचे काम रखडलेले होते. हे काम तत्काळ सुरू व्हावे यासाठी त्यावेळी पालिकेसह राज्यात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपाने पुढाकार घेतला होता. तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाठपुरावा करत हा प्रश्न सोडवत जागा उपलब्ध करून दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी देखील यात लक्ष घालत नाट्यगृहाचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी मदत केली होती.


नियोजित नाट्यगृहास भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला होता. या नाट्यगृहातील एका दालनास श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचेही ठरले होते. परंतु, नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केवळ महापौरांच्या अट्टाहासापोटी नाट्यगृहाचे नाव बदलून त्याला नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. हे चुकीचे असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले .


अटलबिहारी वाजपेयी हे पक्षातीत व्यक्तिमत्त्व होते. साहित्य क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळेच त्यांचे नाव नाट्यगृहास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिकेने नाट्यगृहाचे नामांतर केल्याने स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर प्रेम करणाऱ्या नाट्यप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेने नामांतर ठराव तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली. हा ठराव मागे घेतला नाही तर भाजप याविरोधात जनआंदोलन उभारेल. प्रसंगी प्रजासत्ताकदिनी आयोजित करण्यात आलेला पालकमंत्री अमित देशमुख यांचा सत्कार सोहळाही होऊ देणार नाही, असा इशारा या बैठकीत देण्यात आला. याविषयी गुरुवारी (ता.23) जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन देऊन मनपाने घेतलेला हा ठराव मागे घेण्याची मागणी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, संघटन सरचिटणीस गुरुनाथ मगे, तुकाराम गोरे, शिरीष कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक, विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com