मराठवाड्यात भाजपची मुसंडी

संजय वरकड
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

राज्यभरात मुसंडी मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मराठवाड्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली. कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लातूर जिल्ह्यात भाजपने घसघशीत यश मिळविले. माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांच्याही जिल्ह्यात आता कॉंग्रेसचे वर्चस्व कमी व्हायला लागले. शिवसेना आणि कॉंग्रेसचा आलटून-पालटून प्रभाव असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातही भाजप अव्वलस्थानी राहिला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात कॉंग्रेस सहज सरशी करेल, असे वातावरण होते.

प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्यातही कॉंग्रेसची दमछाक झाली. सत्तेसाठी नांदेडमध्ये कॉंग्रेसला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा टेकू घ्यावा लागेल. नांदेडलाच लागून असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मतदारांनी संमिश्र कौल दिला. परभणी जिल्ह्यामध्ये संमिश्र कौल असल्याने जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली.

मराठवाड्यात सर्वांत धक्कादायक निकाल बीड जिल्ह्यात लागले. राज्यभरात मुसंडी मारणाऱ्या भाजपच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे बीड जिल्ह्यातच नव्हे, तर राज्याच्या राजकारणावर परिणाम होणार आहेत. पंकजा मुंडे यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देऊ केला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या जालना जिल्ह्यात भाजपची घोडदौड राखण्यात यश मिळविले. याचाच अर्थ मराठवाड्यात औरंगाबाद, जालन्यामध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरला, तर लातूरमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला नगरपालिका आणि आता त्यापाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये मोठे यश मिळाले. आगामी काळात या निवडणुकांचे परिणाम जाणवतील. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी बीड आणि उस्मानाबाद हे दोन जिल्हे महत्त्वाचे राहिले. परभणी जिल्ह्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेस क्रमांक एकवर आहे. याचाच अर्थ मराठवाड्यामध्ये नांदेड वगळता कॉंग्रेसची सगळीकडेच धूळधाण झालेली दिसते.

कॉंग्रेस पक्षासाठी आगामी काळ कसोटीचा असणार आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी प्रस्थापित राजकारण्यांनी घराणेशाही चालविली. त्यात सर्वाधिक यश भाजपलाच मिळाले. रावसाहेब दानवे यांची कन्या आशा पांडे (औरंगाबाद जिल्हा सोयगाव गट), पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर (जालना जिल्हा आष्टीकर) यांचा समावेश आहे. सत्तेत असलेल्या भाजपने विद्यमान आमदार आणि मंत्र्यांवर त्या-त्या जिल्ह्याची जबाबदारी टाकली होती. शिवसेनेनेही स्थानिक नेतृत्वाकडे प्रचार आणि उमेदवार निवडीची धुरा सोपविली होती. याउलट कॉंग्रेसमध्ये पुन्हा पुन्हा त्याच त्याच घरात तिकिटे वाटली गेली. राष्ट्रवादी कॉंग्रेसची बीड आणि उस्मानाबाद वगळता इतरत्र हीच अवस्था राहिली. कॉंग्रेसचे नेते उशिरा प्रचाराला उतरल्याने उमेदवारांचेच खच्चीकरण झालेले होते. या सर्वांचा विचार कॉंग्रेसला नक्कीच करावा लागणार आहे.

Web Title: bjp surges into marathwada