बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना भाजप करणार अन्नपुरवठा

BJP Latur News
BJP Latur News

लातूर ः कोरोनाच्या साथीमुळे राज्यासह लातूर जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. शिक्षणासाठी बाहेरगावाहून येथे आलेले अनेक जण त्यामुळे अडकून पडले आहेत. त्यांना खाण्यापिण्याची सोय होणेही कठीण झाले आहे. अशा व्यक्तींना अन्नपुरवठा करण्यासाठी शहर भाजपने पुढाकार घेतला आहे. गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते. राज्याच्या अनेक भागातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येऊन राहतात. संचारबंदी लागू झाल्यामुळे या विद्यार्थ्यांना आपापल्या गावी जाता आले नाही. विद्यार्थ्यांचे येथे घरही नाही. संचारबंदीमुळे मेस व हॉटेल बंद झाले असून विद्यार्थ्यांना जेवण मिळणे कठीण आहे. या विद्यार्थ्यांची उपासमार होऊ नये यासाठी शहर भाजप पुढे सरसावली आहे.


विद्यार्थ्यांसह समाजातील असे अनेक घटक आहेत ज्यांना या कालावधीत अन्न मिळणे कठीण आहे. वृद्ध, आजारी व्यक्तींना बाजारात जाऊन खरेदी करणेही शक्य नाही. अनेकजण एकटे राहतात. त्यांनाही उपाशी राहावे लागत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी भाजपाने पुढाकार घेतला आहे.अशा गरज गरजवंतांनी शहर भाजपचे अध्यक्ष गुरुनाथ मगे (मोबाईल क्रमांक ९४२२६११०१०) व अमोल गीते (८६९८११११४५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गरजूंना घरपोच अन्न सेवा दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होतो. शासनाने जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने विश्व सुपर मार्केटच्या नंदी स्टॉप, बार्शी रोड व अंबाजोगाई रोड वरील तीनही शाखा २४ तास उघड्या राहणार असून नागरिकांना तेथून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार असल्याचेही मगे यांनी सांगितले.


मुलांच्या काळजीने आईचा आजार बळावला
करोना विषाणू प्रतिबंध करण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीमुळे पुण्यात अडकून पडलेल्या दोन मुलांनी थेट लातूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी संपर्क साधला. आपली आई येरोळ (ता. शिरूर अनंतपाळ) या गावी आजारी असल्याची माहिती दिली. संचारबंदीमुळे आपण आईकडे जाऊ शकत नाही, आईवर उपचार करणे गरजेचे आहे अशी माहिती त्यांनी मंत्र्यांना दिली. पालकमंत्र्यांनीही आपली जबाबदारी ओळखत रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथकाला येरोळला पाठवून या आईवर तातडीने तेथेच उपचार केले आहेत. मदतीला धावून आल्याबद्दल या कुटुंबाने देखील पालकमंत्र्यांचे आभार मानले.


येरोळ (ता.शिरूर अनंतपाळ) येथील रहिवासी नरसिंग लोंढे यांच्या पत्नी जमुनाबाई लोंढे या आजारी आहेत. त्यांची माधव व उद्धव ही दोन्ही मुले नोकरीनिमित्त पुणे येथे राहतात. सध्या कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यात पुणे आघाडीवर आहे. आपली मुलेही पुण्यातच राहत असल्याने या आईची काळजीही वाढली. त्यातून आजार बळावत चालला होता. नरसिंग लोंढे यांनी आपली पत्नी आजारी असल्याचे पुणे येथे स्थायिक असलेल्या मुलांना सोमवारी (ता.२३) कळवले. आई आजारी असल्याचे समजल्यानंतर दोन्ही मुले तातडीने पुण्यावरून लातूरला निघाले. मात्र कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे त्यांना पुण्यातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. आईच्या काळजीने व्याकूळ झालेल्या या दोन्ही मुलांनी दूरध्वनीवरून लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशी थेट संपर्क साधला. आपली अडचण व आईच्या आजारपणाबद्दल त्यांना माहिती दिली.

पालकमंत्री देशमुख यांनी त्यांना धीर देत तुम्ही सुरक्षित रहा. आईची काळजी करू नका त्यांच्यावर योग्य उपचार होतील असा शब्द दिला. त्यानंतर श्री.देशमुख यांनी तत्काळ येथील शासकीय आरोग्य यंत्रणा व डॉक्टरांशी संपर्क करून या संदर्भातील माहिती दिली. या महिलेवर तातडीने आवश्यक ते सर्व उपचार करण्याच्या सूचना दिल्या. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या सूचना आल्याने आरोग्य यंत्रणाही हालली. सोमवारी रात्रीच डॉ.अभिषेक वाघमारे वैद्यकीय पथकासह एक रुग्णवाहिका घेऊन येरोळला पोचले. जमुनाबाई लोंढे यांची तपासणी केली. त्यांच्यावर तेथेच उपचार केले. मुलांच्या काळजीमुळे त्यांचा आजार वाढला होता, औषधे दिली आहेत. काळजी करण्याची गरज नाही. आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. वाघमारे यांनी सांगितले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री तातडीने मदतीला धावून आल्याबद्दल या कुटुंबाने त्यांचे आभार मानले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com