esakal | मेंटेंना बीडमधून उमेदवारीस भाजपमधून विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

vinayak mete

बीड : एकीकडे भाजप-शिवसेना युती आणि घटक पक्षांच्या जागांबाबत चर्चा सुरू झाली असतानाच शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना बीडमधून उमेदवारीला भाजपने विरोध केला आहे; पण बीडची जागा मिळणारच असल्याचा दावा "शिवसंग्राम'ने केला आहे

मेंटेंना बीडमधून उमेदवारीस भाजपमधून विरोध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : एकीकडे भाजप-शिवसेना युती आणि घटक पक्षांच्या जागांबाबत चर्चा सुरू झाली असतानाच शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना बीडमधून उमेदवारीला भाजपने विरोध केला आहे; पण बीडची जागा मिळणारच असल्याचा दावा "शिवसंग्राम'ने केला आहे. शिवसंग्राम'चे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपविरोधात, तर राज्यात भाजपसोबत अशी भूमिका घेत भाजपच्या उमेदवार खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्याविरोधात थेट प्रचार केला. तोच संदर्भ जोडून भाजपने मेटेंना बीडमधून उमेदवारी देऊ नये, असा सूर आळवला आहे. 


मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांतच पालकमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार विनायक मेटे यांच्यात राजकीय वितुष्ट आले होते. पुढे जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या निमित्ताने त्यांच्यात झालेली राजकीय दिलजमाई काही दिवसच टिकली. पुढे मेटेंचे काही शिलेदार भाजपच्या कंपूत गेल्याने चिडलेल्या मेटेंनी लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपविरोधी उमेदवाराचा प्रचार केला. मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतावरूनही बीडमध्ये मोठे नाट्य घडले. त्यामुळे विनायक मेटे यांच्या उमेदवारीला भाजप नेते ताकदीने विरोध करणार हे निश्‍चित होते. त्याचे पडसाद उमटायला सुरवात झाली असून चार दिवसांपूर्वी अंबाजोगाईत आलेले भाजपचे जिल्हा निवडणूक निरीक्षक तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे विनायक मेटे यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी मांडली. 
----- 
बीडची जागा शिवसंग्रामलाच 
महायुतीतील घटकपक्ष शिवसंग्रामने राज्यातील 12 जागांची मागणी केली आहे. बीडची जागा शिवसंग्रामलाच मिळेल आणि आमदार विनायक मेटे हेच येथून उमेदवार असतील, असा विश्वास शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांनी व्यक्त केला. शिवसंग्रामच्या संवाद यात्रेनिमित्त बुधवारी (ता. चार) बीडमध्ये आलेल्या श्री. आहेर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. आहेर म्हणाले, की 12 जिल्ह्यांत युवकांशी संवाद साधला. युवकांचे प्रश्न जाणून घेताना बेरोजगारीमुळे नाराजी दिसून येत आहे. युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी शिवसंग्रामतर्फे ठोस कार्यक्रम हाती घेणार आहोत, असेही ते म्हणाले. त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे होते. 

loading image
go to top