लातुरमध्ये पाच दिवसांत दोन खून

हरी तुगावकर
Thursday, 1 October 2020

कोरोनाच्या संदर्भात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. चोरीच्या घटनांतदेखील वाढ झाली आहे.

लातूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध घटना घडत आहेत. त्यात चोरीच्या घटना अधिक आहेत. यातच गेल्या पाच दिवसांत शहरात दोन खून झाले आहेत. यात मंगळवारी (ता.२९) रात्री तत्तापूर (ता. रेणापूर) येथील एका तरुणाचा डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली आहे. त्याचा रात्री मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पाच दिवसांत खुनाची दुसरी घटना आहे.
 
कोरोनाच्या संदर्भात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. चोरीच्या घटनांतदेखील वाढ झाली आहे. त्यात येथील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरात (ता.२४) सप्टेंबर रोजी महेबूब पठाण याचा खून झाला होता. चाकूने त्याचा खून करण्यात आला होता. या घटनेचा तपास अद्याप लागलेला नसतानाच मंगळवारी (ता. २९) रात्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात आणखी एक खुनाची घटना घडली आहे. 

या मंदिराच्या परिसरात श्रीकांत चिल्लरगे (वय २५, रा.तत्तापूर, ता.रेणापूर) या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या डोक्यात वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body of a youth was found in the vicinity of Siddheshwar temple in Latur