esakal | क्वारंटाइनचे आदेश दोघांनी धुडकावले, अजून काय काय घडले ते वाचा...  
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कामठा येथे होम क्वारंटाइनचे आदेश डावलून नांदेड येथे जाणाऱ्या महिलेवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सोमवारी (ता. २५) गुन्हा दाखल झाला.

क्वारंटाइनचे आदेश दोघांनी धुडकावले, अजून काय काय घडले ते वाचा...  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कामठा येथे होम क्वारंटाइनचे आदेश डावलून नांदेड येथे जाणाऱ्या महिलेवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सोमवारी (ता. २५) गुन्हा दाखल झाला. तर अन्य एका घटनेत बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नरवाडी येथे देविदास शामराव माहुरे हा पुणे येथून (ता.१६) मे रोजी आला होता. त्याला घरीच थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, रविवारी (ता. २४) त्याने घरातून पलायन केले. याप्रकरणी पोलिस पाटील लक्ष्मण माहुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

कळमनुरी तालुक्यातील कामठा एक महिला नांदेड येथून गावी आल्यानंतर त्या महिलेला होम क्वारंटाइन होण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सदर महिलेने १४ दिवस घरात राहणे अपेक्षित होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, बाळापूरचे सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या पथकाने कामठा, येडशी तांडा, कांडली, आडा या गावांना आज भेटी दिल्या. या वेळी श्री. खेडेकर यांनी या गावांमधून गावकऱ्यांशी संवाद साधला. तर कामठा येथील भेटीमध्ये एक महिला होम क्वारंटाइन असतानाही नांदेड येथे गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. सदर महिलेवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्री. खेडेकर यांनी दिले. त्यानंतर ग्रामसेवक गोपाल तबडे यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जमादार मधुकर नागरे तपास करीत आहे. 

हेही वाचा - कळमनुरी तालुक्यात ‘कोरोना’चा शिरकाव, पाच गावे कंटेन्मेंट झोन

चाफनाथ येथील दहा जण क्‍वारंटाइन
कळमनुरी ः तालुक्यातील चाफनाथ येथील कोरोनाबाधित झालेले तीन रुग्ण आढळून आल्यानंतर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना कळमनुरी येथे सोमवारी (ता. २५) क्‍वारंटाइन केले. मुंबई येथे कामासाठी स्थलांतर करणाऱ्या चाफनाथ येथील चार नागरिक मुंबई येथून मंगळवारी (ता. १९) गावी परतले. त्‍यांनी शाळेतील विलगीकरण कक्षामध्ये थांबण्यास नकार दिला. यात दोन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी या प्रकाराची माहिती आरोग्य व पोलिस प्रशासनाला दिली. त्‍यानंतर अधिकारी, कर्मचारी गावात पोचले, त्यांनी या नागरिकांच्या अडचणी समजून घेत पोलिस प्रशासनाने सतर्कता दाखवून या नागरिकांना गावांमधील शाळेमध्ये तयार केलेल्या विलगीकरण कक्षाऐवजी कळमनुरी क्‍वारंटाइन सेंटरमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. कळमनुरी येथे आल्यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यात चारपैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे चाफनाथ गावात खळबळ उडाली. दरम्यान, मुंबईहून आलेल्या या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या गावातील त्यांचे कुटुंबीय व इतर दहा जणांना आरोग्य विभागाने सोमवारी क्‍वारंटाइन सेंटरला हलविले आहे. शाळेतील विलगीकरण कक्षामध्ये राहण्यास नकार दिल्यानंतर या नागरिकांना समजून सांगण्यासाठी कळमनुरी येथून तीन सामाजिक कार्यकर्तेही भेटावयास गेल्याची माहिती हाती आली आहे.


हेही वाचा - घरोघरी नमाज अदा; ‘कोरोना’मुक्‍तीसाठी दुआ...

‘त्‍या’ पोलिस कर्मचाऱ्याचा जामीन मंजूर
हिंगोली ः तालुक्‍यातील माळसेलू येथील अतिक्रमण काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून दहा हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या त्या पोलिस कर्मचाऱ्याला सोमवारी (ता. २५) सत्र न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने पंधरा हजारांच्या जात मुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे. हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील येथे तक्रारदाराच्या जागेवर एका व्यक्तीने अतिक्रमण केले होते. सदर अतिक्रमणाबाबत तक्रारदाराने हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता. सदर अतिक्रमण काढून देण्यासाठी बिट जमादार नंदकुमार मस्के याने २५ हजारांची लाच मागितली. त्यापैकी दहा हजार रुपये २४ मे रोजी देण्याचे ठरले. या प्रकरणात तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत विभागात तक्रार दिली. त्यानंतर लाचलुचपतचे उपाधीक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक ममता अफुणे, जमादार सुभाष आढाव, अभिमन्यू कांदे, विजय उपरे, तानाजी मुंडे, ज्ञानेश्‍वर पंचलिंगे, विनोद देशमुख, प्रमोद थोरात, अवी कीर्तनकार यांच्या पथकाने कारवाई करून आरोपीला लाचेची रक्कम दहा हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सोमवारी आरोपीला येथील सत्र न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यावर आरोपीच्या वतीने विधिज्ञ मनिष साकळे यांनी जामीन अर्ज दाखल केला. त्‍यांना ॲड. गणेश घुगे व ॲड. हर्ष बनसोडे यांनी सहकार्य केले. या अर्जावर झालेल्या युक्तिवादानंतर न्यायाधीश एन. बी. शिंदे यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला. 

गैरकायद्याची मंडळी जमविल्याप्रकरणी गुन्हा
हिंगोली ः जवळा बाजार येथे बसस्‍थानकासमोर असलेल्या जिन्स पार्क दुकानासमोर आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून एका आरीने उजव्या पायाच्या मांडीस दुखापत करण्याच्या उद्देशाने मारून खिशातील मोबाइलचा स्‍फोट होऊन मांडी भाजून गंभीर दुखापत केली. तर दुसऱ्या आरोपीने हमालीसाठी वापरण्यात येणाऱ्या हुकाने डाव्या डोळ्याखाली व इतर ठिकाणी मारून जखमी केले. तसेच इतर दोन आरोपींनी थापडबुक्‍यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद बालाजी भालेराव (रा. गुंडा) यांनी हट्टा पोलिस ठाण्यात दिल्यावरून रविवारी गुन्हा दाखल झाला.

जुगार अड्ड्यावर छापा
हिंगोली ः हट्टा येथे रविवारी (ता. २४) एका जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कारवाई करून जुगाराचे साहित्य व एक मोटारसायकल, असा एकूण ४२ हजार ३५० रुपयांचा माल जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दारू बंदी कायद्यांतर्गत सहा ठिकाणी छापे टाकून आरोपींविरुद्ध कारवाई करून त्‍यांच्याकडून सहा हजार ५५२ लिटर दारू व तीन मोटार सायकली, असा एक लाख १२ हजार २८० रुपयाचा अवैध दारूसाठा जप्त केला.