मजूर कुटुंबातील 'बहाद्दूर' संविधानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दहा हजार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

तलावात बुडणाऱ्या विद्यार्थ्याला वाचविण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या ८ वर्षीय बहाद्दूर संविधानने आता कोरोनाच्या लढ्यातही मोठे योगदान दिले आहे. आपली बक्षीस म्हणून मिळालेली १० हजार रुपये रक्कम त्याने मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन बहादुरीबरोबरच आपली दानतदेखील दाखवून दिली आहे.

बीड : तलावात बुडणाऱ्या विद्यार्थ्याला वाचविण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या ८ वर्षीय बहाद्दूर संविधानने आता कोरोनाच्या लढ्यातही मोठे योगदान दिले आहे. आपली बक्षीस म्हणून मिळालेली १० हजार रुपये रक्कम त्याने मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन बहादुरीबरोबरच आपली दानतदेखील दाखवून दिली आहे.

रेल्वेच्या कामात मजुरी करणाऱ्या चाटगाव (ता. धारूर) येथील कुटुंबातील ८ वर्षाच्या तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या संविधान दीपक गडसिंग याने चाटगाव येथील तलावात एका शाळकरी मुलीला पाण्यात बुडण्यापासून मोठ्या हिमतीने वाचवले होते. त्यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून संविधानचे कौतुक व सत्कार करण्यात आले होते. त्याचबरोबर त्याच्या या बहादुरीबद्दल अनेकांनी त्याला रोख बक्षीसही दिले होते. 

बक्षिसातून गोळा झालेली दहा हजार रुपये रक्कम संविधानने आज कोरोनाच्या संकटाशी सामना करत असलेल्या राज्य सरकारला देऊन त्याच्या नावाप्रमाणेच कामगिरी केली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

संविधानचे वडील दीपक गडसिंग हे बीड-परळी रेल्वेमार्गावर मजुरी करतात. घरची परिस्थिती तशी नाजूकच; तरीही त्याने व त्याच्या कुटुंबाने दाखवलेले हे औदार्य वाखाणण्याजोगे व समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित करणारे आहे. त्याने ह्या मदतीचा धनादेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हाती सुपूर्द केला. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आमदार अमरसिंह पंडित उपस्थित होते.

संविधानने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी 'तुझ्या संविधान या नावातच सर्वकाही आहे,' अशा शब्दात धनंजय मुंडेंनी संविधान व त्याच्या कुटुंबियांचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bravory Awardee Contributed In CM Relief Fund For Coronavirus Maharashtra News