
मालेगाव येथे संचारबंदी काळात बंदोबस्ताच्या ड्यूटीवर गेलेल्या हिंगोली इथल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब मंगळवारी (ता. २१) समोर आली आहे.
हिंगोली : मालेगाव येथे संचारबंदी काळात बंदोबस्ताच्या ड्यूटीवर गेलेल्या हिंगोली इथल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब मंगळवारी (ता. २१) समोर आली आहे.
हिंगोलीच्या राज्य राखीव पोलिस दलाचे १०७ अधिकारी आणि जवान मालेगावला, तर ८४ जवान मुंबईला बंदोबस्तासाठी गेले होते. ४५ दिवसांच्या ड्यूटीवरून परत आल्यानंतर त्या सर्वांना एसआरपीएफ कॅम्पमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. राज्य राखीव पोलीस बलाच्या गट क्रमांक बारामधील या सर्व १९१ अधिकारी व जवानांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय - घाटीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.
यातील १०१ जणांच्या चाचणीचे अहवाल आज रात्री आले. त्यात या १९१ पैकी सहा जणांना कोरोणाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले. हे एसआरपीएफचे सहाही कोरोनाग्रस्त जवान मालेगाव येथून बंदोबस्ताची आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एका तरुणाचाही 'सारी'ने मृत्यू.
मुंबई येथून आलेल्या हिंगोली तालुक्यातील एका ३० वर्षीय तरुणाचाही आज जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्यात 'सारी'ची लक्षणे आढळल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. या मृताच्या स्वॅबचा अहवाल औरंगाबादहून आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेने हिंगोली जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा
काही दिवसांपूर्वी दिल्ली मरकज येथून आलेल्या वसमत येथील एका युवकाला कोरोनाची साम्य लक्षणे दिसून आल्याने त्याला रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती केले होते. परंतु त्याचे स्वॅब नमुने अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन चांगलेच हादरले होते. त्या रुग्णाला व्यवस्थित उपचार मिळाल्याने तो १४ दिवसानंतर ठणठणीत बरा होऊन घरी गेला.
जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला होता, तोच मंगळवारी राज्य राखीव दलातील सहा जवानांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आले आहे.