ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टीमुळे स्तन वाचवणे शक्य ः डॉ. चैत्यानंद कोप्पीकर

योगेश पायघन
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

कर्करोग रुग्णालयात कार्यशाळा ः ब्रेस्ट कॅन्सरवर शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक 

पूर्वी स्तन कर्करोग झाल्यावर पूर्ण स्तन काढण्याची शस्त्रक्रिया केली जात होती. पूर्ण स्तन काढल्यावर महिलांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होत होता; मात्र अत्याधुनिक उपचार, निदान पद्धतीने आता अर्ली डिटेक्‍ट ब्रेस्ट कॅन्सरमध्ये केवळ गाठ काढण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. ती गाठ काढल्यावर पडणारा खड्डाही भरता येतो. त्यासाठी लवकर निदानावर भर देण्याची गरज असल्याचे मत डॉ. कोप्पीकर यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद - स्तन कर्करोगाबद्दल स्त्रियांमध्ये जागरूकता वाढल्याने 70 टक्के रुग्ण पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात लक्षात येतात. त्यामुळे स्तनातील केवळ गाठ ही "ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टी' या उपचारपद्धतीने काढता येते. शिवाय गाठ काढल्यावर निर्माण होणारी पोकळीही भरून काढता येते; मात्र त्यासाठी लवकर निदान गरजेचे आहे, अशी माहिती पुणे येथील स्तन कर्करोग सर्जरीचे तज्ज्ञ डॉ. चैत्यानंद कोप्पीकर यांनी दिली.

लाइव्ह सर्जिकल वर्कशॉप : ऍडव्हान्स इन डायग्नोटिक्‍स ऍण्ड मॅनेजमेंट ऑफ ब्रेस्ट कॅन्सर ही एकदिवसीय कार्यशाळा शासकीय कर्करोग रुग्णालयात शनिवारी (ता. पाच) झाली. यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेत औरंगाबादसह नांदेड, लातूर, अंबाजोगाई येथील 215 डॉक्‍टरांनी सहभाग नोंदविला. यावेळी डॉ. कोप्पीकर यांनी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करून डॉक्‍टरांना मार्गदर्शन केले. या शस्त्रक्रियांचे शस्त्रक्रियागृहातून थेट प्रक्षेपण करण्यात आले.

पूर्वी स्तन कर्करोग झाल्यावर पूर्ण स्तन काढण्याची शस्त्रक्रिया केली जात होती. पूर्ण स्तन काढल्यावर महिलांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होत होता; मात्र अत्याधुनिक उपचार, निदान पद्धतीने आता अर्ली डिटेक्‍ट ब्रेस्ट कॅन्सरमध्ये केवळ गाठ काढण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. ती गाठ काढल्यावर पडणारा खड्डाही भरता येतो. त्यासाठी लवकर निदानावर भर देण्याची गरज असल्याचे मत डॉ. कोप्पीकर यांनी व्यक्त केले. "ऍप्रोच टू ब्रेस्ट ट्युमर' या विषयावर डॉ. अजय बोराळकर यांनी व्याख्यान दिले. त्यात त्यांनी अद्ययावत निदान व तपासण्यांच्या पद्धती तज्ज्ञांना समजून सांगितल्या. कॅन्सरच्या सर्जरीनंतर लागणाऱ्या सहायक थेरपीबद्दल डॉ. अनघा वरूडकर यांनी मार्गदर्शन केले.

घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. यावेळी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्चना राठोड, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनघा वरूडकर, डॉ. अजय बोराळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेस डॉ. ऋषिकेश खाडिलकर, डॉ. आशुतोष तोंडारे, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. रमाकांत आलापुरे, डॉ. अब्दुल राफे, डॉ. मनोज मोरे, डॉ. अमित बगाडिया, डॉ. अर्जुन मोरे, डॉ. अदिती लिंगायत, डॉ. कोकणकर, डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, डॉ. सरोजिनी जाधव, डॉ. अजय वरे, डॉ. सुरेश हरबडे आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breast oncoplasty can save the breast