अधिकारी अन्‌ लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

जिल्हा परिषदेतील महिला समाजकल्याण अधिकारी व लिपिकाला पाच हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. सुटीची अर्जित रजा मंजुरीसाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ही कारवाई जिल्हा परिषदेत करण्यात आली.

औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील महिला समाजकल्याण अधिकारी व लिपिकाला पाच हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. सुटीची अर्जित रजा मंजुरीसाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ही कारवाई जिल्हा परिषदेत करण्यात आली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, मीना अशोक अंबाडेकर (वय ४५) व हनीफ इब्राहिम शेख अशी संशयितांची नावे आहेत. मीना अंबाडेकर या जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागात अधिकारी आहेत. तर हनीफ शेख लिपिक आहे. या प्रकरणातील तक्रारदार शासकीय प्रौढ अपंगाचे प्रशिक्षण केंद्र येथे नोकरीला आहेत. त्यांनी पाच डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ तसेच १६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ या काळात एकूण ४२ दिवस अर्जित रजा घेतली. या रजा मंजूर करून घेणे आवश्‍यक असल्याने त्यांनी फेब्रुवारीमध्ये प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर तेरा मे रोजी त्यांना समाजकल्याण अधिकारी अंबाडेकर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी रजा मंजुरीच्या बदल्यात पाच हजारांची मागणी केली. याविरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. याप्रकरणी पथकाने पडताळणी केली असता अंबाडेकर यांनी पाच हजार मागितल्याचे व ही रक्कम लिपिक हनीफ शेखकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पथकाने सापळा रचून हनीफ शेखला पाच हजारांची रक्कम घेत ती मीना अंबाडेकर यांच्याकडे देताना पकडले. 

ही कारवाई उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलिस नाईक अश्‍वलिंग होनराव, भीमराज जीवडे, कल्याण सुरासे, दिगंबर पाठक, बाळासाहेब राठोड, पुष्पा दराडे, संदीप चिंचोले यांनी केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bribe Officer and Clark Arrested Crime