
उस्मानाबाद येथे लंडनहुन परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची निष्पन्न झाले आहे.
उस्मानाबाद : येथे लंडनहुन परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची निष्पन्न झाले आहे. त्याची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्याचा स्वॅब घेऊन पुण्यामध्ये तपासणीसाठी पाठविला जाणार आहे. या रुग्णाकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाने अधिक लक्ष दिले आहे. हा रुग्ण लंडन येथून मुंबई विमानतळावर २१ डिसेंबर रोजी आल्याची नोंद आहे. त्यानंतर ते त्यांच्या मुंबईच्याच मित्राच्या घरी राहण्यासाठी गेले. तिथे दोन दिवस राहिल्यानंतर ते उस्मानाबादला २३ डिसेंबरला आले. या रुग्णाची मुंबईच्या विमानतळावर टेस्ट केल्यानंतर तो निगेटिव्ह आला होता. मात्र त्यानंतर त्याना किरकोळ ताप व सर्दी जाणवत असल्याने त्यांना घरीच वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते.
त्यांचा प्रत्यक्ष कोणाशी संपर्क आलेला नसला तरी कुटुंबातील सदस्यांशी अप्रत्यक्षरित्या संपर्क आल्याचे दिसुन आले आहे. लक्षणे जाणवत असल्याचे पाहुन रुग्णांने स्वतः आपल्या कारमध्ये येऊन जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाला. शनिवारी(ता.दोन) रोजी त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. त्यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे दिसून आले. त्या रुग्णाच्या बाबतीत जिल्हा रुग्णालयाची टीम अत्यंत दक्ष असुन त्यांना वेगळ्या रुममध्ये ठेवण्यात आले आहे. त्या रुग्णाची परिस्थिती अत्यंत चांगली असुन प्रकृती उत्तम आहे.
रुग्णाचा स्वॅब पुण्याला पाठविण्यात आल्यानंतर त्या अहवालावरुनच तो कोणत्या प्रकारचा कोविड आहे. हे लक्षात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी या रुग्णामुळे जिल्हा रुग्णालयासह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईमध्ये आल्यानंतर निगेटिव्ह आल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी मधल्या काळात ही बाधा झालेली आहे की, पूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. नवीन कोरोनाची पसरण्याचे प्रमाण हे अत्यंत जलद व मोठ्या संख्येने असल्याचा दावा या अगोदरच केलेला आहे. त्यामुळे रुग्णांचा संपर्क होणार नाही याची काळजी घेण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
संपादन - गणेश पिटेकर