फाटलेली नोट दाखवली अन्‌ मंगळसूत्र पळविले!

मनाेज साखरे
Sunday, 20 October 2019

सातारा परिसरात महिला दुकानदारासोबत प्रकार

औरंगाबाद- बिस्कीट पुडे खरेदीच्या बहाण्याने एक भामटा दुकानात आला. वीस रुपयांची फाटलेली नोट दुकानदार महिलेला दिली. संधी साधत नोट फाटकी असल्याचे सांगून ती अदलाबदलीत गर्क असलेल्या दुकानदार महिलेचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र त्याने हिसकावून पलायन केले. काही मिनिटांतच झालेला हा प्रकार 19 ऑक्‍टोबरला सातारा भागातील सम्राटनगर येथे घडला. 

बबनबाई जगन्नाथ जाधव (60, रा. सम्राटनगर, सातारा परिसर) यांचे किराणा दुकान आहे. त्या दुकानात असताना रात्री पावणेनऊच्या सुमारास एकजण आला. त्याने दोन बिस्कीट पुडे घेतले. त्यानंतर त्याने वीस रुपयांची फाटलेली नोट बबनबाई यांना दिली. नोट गल्ल्यात टाकताना ती फाटकी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ती नोट बदलून देण्यास सांगितले. 

दुसरी नोट खिशातून काढण्याच्या बहाण्याने भामटा त्यांच्याजवळ गेला. त्याने नोट दाखवा असे म्हणून बबनबाई यांचे लक्ष विचलित केले व क्षणात त्यांचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. त्यानंतर बबनबाई यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत भामटा पसार झाला होता. ही घटना घडल्यानंतर बबनबाई यांनी सातारा पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार शेख हारुण करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A broken note was shown and Mangalsutra fled

Tags
टॉपिकस
Topic Tags: