पोलिस दलातील ‘ब्रुनो’चा वाढदिवस !

file photo
file photo

परभणी : जिल्हा पोलिस दलातील श्वान पथकात कर्तव्यावर असलेला बॉम्ब शोधण्यात वाकबगार असा श्वान ‘ब्रुनो’ याचा तिसरा वाढदिवस बॉम्बशोधक व अपराध शोधक पथकातील सदस्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. १८) मोठ्या उत्साहात साजरा केला. दरम्यान, श्वान ‘ब्रुनो’ने मंगळवारी तिसरा वाढदिवस साजरा करत दिवसभर आपली दिनचर्या, कर्तव्य बजावले. बुधवारीही (ता. १९) दिवसभर शिवजयंती मिरवणुकीच्या मार्गांची पाहणी करत पोलिस दलात मदत केली.

परभणी पोलिस दलातील बॉम्बशोधक व नाशक पथक मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. या पथकातील श्वान हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. जिल्ह्यात, शहरात कुठेही संशयित वस्तू आढळली तर त्या ठिकाणी श्वानासह पथक तातडीने रवाना होत असते. संशयित वस्तूजवळ जाऊन बॉम्ब आहे की नाही, हे तपासण्याचे महत्त्वाचे काम पथकातील श्वान करत असतात. तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले या पथकातील श्वान हजारो नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम करत आले आहेत. परभणी पोलिस दलातील ‘ब्रुनो’ हे श्वानही सद्यःस्थितीत पोलिस दलास मोठी मदत करीत आहे. 

‘ब्रुनो’ ला केक भरुन सदिच्छा
मंगळवारी पथकातील फौजदार किशोर नाईक, कर्मचारी मोहन लोखंडे, प्रेमदास राठोड, साहेब तोटेवाड, अमोल सिरस्कर, सीता वाघमारे, रामचंद्र जाधव, मारोती बुधवारे, शेख शाकीर, मो. इनामदार, महारूद्र सपकाळ यांनी ब्रुनोचा तिसरा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. या वेळी ‘ब्रुनो’स पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर त्यास केक भरुन सदिच्छा देण्यात आल्या. या वेळी त्याचे सहकारी श्वान जॉनी, पंच, रिओ, ओरियन यांचीही उपस्थिती होती. 

पोलिसांच्या स्पर्धेत सहभागी नाही
विशेष म्हणजे मागील दोन दिवसांपासून शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गांची तपासणी व पाहणी बॉम्बशोधक पथकाने त्या-त्या गावात, शहरास भेटी देऊन केली. त्यानंतर बुधवारी (ता. १९) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसरासह मिरवणूक मार्गाचीही पाहणी, तपासणी कामात श्वान ‘ब्रुनो’ने मदत केली. केवळ तीन वर्षांचाच असल्याने ‘ब्रुनो’ला अद्याप पोलिसांच्या स्पर्धेत सहभागी केले नाही. मात्र, येणाऱ्या महाराष्ट्र पोलिस कर्तव्य मेळाव्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी ‘ब्रुनो’कडून तयारी करून घेतली जात असून त्याचाही त्यास चांगला प्रतिसाद असल्याचे फौजदार श्री. नाईक म्हणाले.


कर्तव्यात तो एक्सपर्ट
‘ब्रुनो’ केवळ तीनच वर्षांचा आहे. त्याचा जन्म १८ फेब्रुवारी २०१७ ला झाला. तर, २८ मार्च २०१७ रोजी तो जिल्हा पोलिस दलाच्या श्वान पथकात सामील झाला. त्याला तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले आहे. बॉम्ब शोधण्यात तो वाकबगार असून अनेक ठिकाणी त्याने त्याची प्रचितीही दिली आहे. हँडलर लखनसिंग ठाकूर व मनोहर लोखंडे हे आहेत. हे दोघेही त्याची पूर्ण काळजी, निगा राखतात. तीन वर्षांचाच असलेला श्वान ‘ब्रुनो’ हा चांगला तंदुरुस्त असून कामात, कर्तव्यात तो एक्सपर्ट असल्याचे श्री. ठाकूर, लोखंडे यांनी म्हटले.
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com