मंजन समजून चिमुकलीने विषपावडरने घासले दात

स्वरा दळवी
स्वरा दळवी

भोकरदन (जि.जालना) -  दंतमंजन समजून घरात ठेवलेल्या विषारी पावडरने दात घासल्याने यातून झालेल्या विषबाधेतून चारवर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 26) प्रजासत्ताकदिनी घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील दानापूर येथील जनार्दन दळवी यांची चारवर्षीय मुलगी स्वरा हिने रविवारी (ता. 26) सकाळी दहा वाजेच्या सुमारास खेळत असताना घरातील एका खिडकीत उंदीर मारण्यासाठी ठेवलेले विषारी पावडर दंतमंजन समजून हातावर घेतले व दात घासत-घासत ती घराच्या अंगणात खेळायला लागली. काही वेळाने तिचे आजोबा बाहेरून येत असताना त्यांनी स्वराला उचलून कडेवर घेतले, यावेळी तिच्या तोंडातून काही तरी उग्र वास आल्याने आजोबांनी तिला विचारले असता, तिने खिडकीत ठेवलेली ती विषारी औषधाची पुडी दाखविली.

त्यामुळे घाबरलेल्या आजोबांनी परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने दानापूर येथून तत्काळ भोकरदन येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तिची स्थिती खालावत असल्याने तिला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान सायंकाळी तिची प्राणज्योत मालावली. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

परिवारावर कोसळले आभाळ 

अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिवारावर दुःखाचे आभाळ कोसळले आहे. स्वरा ही जनार्दन दळवी यांची एकुलती एक मुलगी होती. रविवारी रात्री दानापूर येथे तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मनाला चटका लावणारा आठवडा 

आठवडाभरात तालुक्‍यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांत तीन लहान चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. मागील रविवारी नांजा पाटीवर ट्रक अपघातात रुद्र मोरे याचा, तर तीन दिवसांपूर्वी सहलीला जाण्याच्या गडबडीत बाथरूममध्ये पाय घसरून गोपिका कऱ्हाळे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यातच रविवारी दानापूर येथे घडलेल्या या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण तालुक्‍यावर शोककळा पसरली आहे. हा आठवडा मनाला चटका लावणारा ठरल्याची चर्चा होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com