बुध्दांचे मानवता आणि शांतीचे तत्वज्ञान जगाला मान्य

प्रल्हाद कांबळे
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद येथील अंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेच्या संदर्भात येथे संवाद साधतांना भन्ते पय्याबोधी बोलत होते.

नांदेड : तथागत गौतम बुध्दांचे शांती, अहिंसा, मानवता आणि समानतेचे तत्व संबंध जगाने आज मान्य केले आहेत. असे मत नांदेडचे भदंत पय्याबोधी यांनी व्यक्त केले आहेत. ते औरंगाबाद येथील अंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेच्या संदर्भात येथे संवाद साधतांना त्यांनी वरिल मत व्यक्त केले.

भन्ते पय्याबोधी म्हणाले की, औरंगाबाद येथे जागतिक बौध्द धम्म परिषद गेल्या तीन दिवसांपासून सुरु झाली आहे. या जागतिक धम्म परिषदेचे उद्घाटन अंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार प्राप्त आणि जागतिक कीर्तीचे तिबेट येथील बौध्द धम्म गुरु दलाईलामा यांच्या हस्ते झाले. यावेळी जगातील नेपाळ, श्रीलंका, दक्षिण कोरिया, थायलंड, म्यानमार, अरुणाचल प्रदेश यासह १५ देशातील विद्वान भंते यांनी औरंगाबादच्या परिषदेत मार्गदर्शन केले. हा ऐतिहासिक जागतिक किर्तीचा धम्म सोहळा संबंध महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला प्रेरणादायी ठरला आहे.

 मानवतेला पंचशिल मार्गाची गरज

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दिक्षा भूमीवर १९५६ साली धम्मक्रांती केली. या धम्मक्रांतीमुळे बुध्द धम्म काय आहे याचे तत्वज्ञान संबंध मानवतेला कळाले आहे. आम्ही बुध्द झालो, आणि इतरांनाही बुध्दांचे तत्वज्ञान देवून समता, शांती आणि मानवतेच्या पंचशील मार्गावर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. बुध्दांचे पंचशील, अष्टांगीक मार्ग याशिवाय समानता, प्रज्ञा शील करुणा, मानवता, सत्य, अहिंसा आणि शांती हे सर्व तत्वज्ञान आज जगाने मान्य केले आहे. बुध्दांच्या तत्वज्ञानाने संबंध मानवाचे कल्याण निश्चित होते. ऐवढे बुध्दांचे तत्वज्ञान जगाच्या कसोटीवर आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासले गेले आहे. या बुध्दांच्या तत्वज्ञानासमोर संपूर्ण अध्यात्माचा कचरा झाला आहे, हे सूर्यप्रकाशा ऐवढे सत्य आहे.

आगामी २१ व्या शतकात संपूर्ण विश्व हे बौध्दमय बनेल

विशेषतः विपश्यनेचे मार्गदर्शक गोयंका यांनी बुध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार व विपश्यनेचे तत्वज्ञान संबंध भारताला सांगितले आहे. त्या तत्वज्ञानाची महती आता संबंध जगालाही हळुहळू कळू लागली आहे. त्याच प्रमाणे भदंत राहुल या जागतिक कीर्तीच्या भारतीय बौध्द भिक्क्षूंनी आगामी २१ व्या शतकात संपूर्ण विश्व हे बौध्दमय बनेल हा आशावाद त्यांनी सांगितला होता. तो आशावादा औरंगाबाद येथील जागतिक कीर्तीच्या धम्म परिषदेने परिपूर्ण होत आहे. आजच्या जगामध्ये विविध स्पर्धा, युध्दाची भाषा होऊ लागली आहे. राग, द्वेष आणि हिंसेच्या विचाराने अनेक देश भडकत असतांना बुध्दांच्या विचारांची किती गरज आहे. कारण हिंसेपेक्षा अहिंसा आणि शांती हीच जगाला सारु शकेल असे ते म्हणाले.

डॉ. आंबेडकरांचे प्रबुध्द भारताचे स्वप्न पूर्ण करु

एकंदरीत औरंगाबाद येथील जागतिक बौध्द धम्म परिषद म्हणजे बुध्द तत्वज्ञानाची मानवासाठी दिलेली एक प्रकारे शिदोरी आहे असे ते म्हणाले. यावेळी जागतिक किर्तीचे बौध्द धम्मगुरु दलाई लामा यांचा आशीर्वाद नांदेड येथील भदंत पय्याबोधी यांनी घेतला आहे. त्यांनी बुध्दांचे तत्वज्ञान प्रत्येक माणसांपर्यंत पोंहचून डॉ. आंबेडकरांचे प्रबुध्द भारताचे स्वप्न पूर्ण करु अशी शपथ घेतली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buddha's philosophy of humanity and peace is acceptable to the world