Jalna : बुलेट ट्रेनपेक्षा ‘वंदे भारत’ सरस: वैष्णव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

Jalna : बुलेट ट्रेनपेक्षा ‘वंदे भारत’ सरस: वैष्णव

जालना : बुलेट ट्रेन सुरू करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी समृद्धी महामार्गाच्या बाजूने जागेची पाहणी करून निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, बुलेट ट्रेनपेक्षा ‘वंदे भारत रेल्वे’ सरस आहे, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी येथे व्यक्त केले.

वैष्णव यांच्या हस्ते सोमवारी येथे पिटलाईनच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आदींची उपस्थित होते. वैष्णव म्हणाले, ‘बुलेट ट्रेन’ चा वेग अधिक असल्याने यासंदर्भातील प्रकल्पांची मागणी वाढत आहे. त्यात मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या मागणीचाही समावेश आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गालगतच्या जागेची पाहणी केल्यानंतर या संदर्भातील निर्णय घेण्यात येईल.

बुलेट ट्रेनपेक्षाही देशात निर्माण झालेली ‘वंदे भारत रेल्वे’ चांगली आणि सक्षम आहे. ही रेल्वेही अत्याधुनिक सोयी सुविधांसह वेगवान आहे. त्यामुळे देशात याच रेल्वे सुरू करण्यावर भर असेल. या रेल्वेसाठी लातूर येथील कारखान्यातून दहा ते अकरा महिन्यांनंतर बोगी निर्मिती सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

पुरणपोळीचा आग्रह!

रेल्वेमंत्री पद मिळाल्यानंतर कामाचा व्याप वाढला आहे. प्रकल्प, प्रश्न सोडविण्यासाठी दानवे यांच्यासोबत अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नवीन प्रकल्पांचे सादरीकरण केले. या काळात अनेक वेळा दावनेंकडे पुरणपोळीच्या जेवणाची इच्छा बोलून दाखवली. पण ती अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे आज पुरणपोळी खाल्ल्याशिवाय जाणार नाही, असा किस्सा वैष्णव यांनी सांगितला.