esakal | बैलांनी बैलगाडी नेली थेट तलावात,शेतकऱ्यासह गाईचा बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

भोकरदन (जि.जालना) : तहानलेल्या बैलांनी बैलगाडी तलावात नेल्याने शेतकऱ्यासह गाईचा बुडून मृत्यू झाला.

बैलांनी बैलगाडी नेली थेट तलावात,शेतकऱ्यासह गाईचा बुडून मृत्यू

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : तहानलेल्या बैलजोडीला व गायीला पाणी पाजण्यासाठी तालुक्यातील (Bhokardan) रजाळा येथील एका शेतकऱ्याने जनावरे पाझर तलावावर (Pond) नेले. मात्र, बैल जास्तच तहानलेले असल्याने या दोन्ही बैलांनी बैलगाडी सरळ तलावातच ओढत नेली. घडलेल्या या घटनेत शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, गाडीला बांधलेली गाय देखील यात मरण पावली आहे. तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी (Farmer) धावाधाव करून दोन्ही बैलांना सुखरूप पाण्याबाहेर काढले. ही घटना सोमवारी (ता.१३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. राजू पांडुरंग साळवे (वय ४७) असे घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील (Jalna) रजाळा येथील शेतकरी राजू साळवे यांची रजाळा शिवारात शेतजमीन आहे. सोमवारी दुपारी ते आपल्या शेतात बैलगाडी घेऊन निघाले असता त्यांनी गावालगत असलेल्या पाझर तलावात जनावरांना पाणी पाजून जावे म्हणून बैलगाडी पाझर तलावाकडे वळवली.

हेही वाचा: रस्त्यावरील खड्ड्याने घेतला दोघांचा बळी, सिल्लोड जवळील घटना

तलावाजवळ बैलगाडी सोडून त्यांना पाणी पाजू असे त्यांना वाटले असावे. परंतु सकाळपासून बैल तहानलेले असल्याने पाणी पिण्यासाठी बैलांनी सरळ गाडी तलावात ओढत नेली. त्यात नुकत्याच झालेल्या पावसाने सदरील पाझर हा तलाव पूर्णपणे भरलेला असल्याने बैलगाडी खोल पाण्यात गेल्याने राजू साळवे यांना ती थांबवता आली नाही. तलावाच्या मधोमध जाऊन गाडी पाण्यात पलटी झाली. ही घटना आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ धाव घेऊन दोन्ही बैल व शेतकरी राजू साळवे यांना पाण्याबाहेर काढले. मात्र, राजू साळवे यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर गाडीला पाठीमागे बांधलेली एक गाय देखील यात मरण पावली. तर बैलांचा कासरा तोंडून त्यांना मोकळे केल्याने दोन्ही बैल या घटनेतून बचावले. मृत राजू साळवे यांची भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात येत आहे. तर या घटनेचा पोलिसांकडून पंचनामा करण्यात आली आहे. मृत शेतकरी राजू साळवे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील,चार मुले, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे.

loading image
go to top