बीड जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यांतील मजुरांना घेऊन लालपरी रवाना 

पांडुरंग उगले 
Sunday, 17 May 2020

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जवळपास दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केल्याने अनेक नागरिक परजिल्ह्यात अडकून पडले होते. सर्वकाही बंद असल्याने विविध जिल्ह्यांत असलेल्या परराज्यातील मजुरांनी मिळेल त्या मार्गाने घराची वाट धरली होती.

माजलगाव (जि. बीड) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या लॉकडाउनमुळे परराज्य, जिल्ह्यातील अडकून पडलेल्या नागरिकांना घेऊन लालपरी रवाना झाली आहे. माजलगाव आगारातून दोन दिवसांत सात बस सोडण्यात आल्या असून, यातील पाच बस शुक्रवारी (ता.१५) मध्य प्रदेश, तर शनिवारी (ता. १६) दोन बस औरंगाबादसाठी पाठविण्यात आल्या आहेत. 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जवळपास दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित केल्याने अनेक नागरिक परजिल्ह्यात अडकून पडले होते. सर्वकाही बंद असल्याने विविध जिल्ह्यांत असलेल्या परराज्यातील मजुरांनी मिळेल त्या मार्गाने घराची वाट धरली होती. दिवसेंदिवस लॉकडाउनचा कालावधी वाढत चालल्याने महाराष्ट्रात अडकून पडलेल्या मजुरांना, तर परजिल्ह्यातील नागरिकांना बसने सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतून बस रवाना होत आहेत.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

माजलगाव आगार प्रशासनाने आठ दिवसांपासून याची तयारी सुरू ठेवली असताना शुक्रवारी (ता.१५) पाच बस मध्य प्रदेश, तर शनिवारी (ता.१६) दोन बस औरंगाबादसाठी रवाना झाल्या आहेत. कोरोनामुळे तालुक्यातील पात्रुड येथील कापसाच्या जिनिंगवर मध्य प्रदेशमधील अनेक मजूर त्यांच्या गावी जाण्याच्या प्रतीक्षेत होते. यामुळे त्यांनी रीतसर नोंदणी केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आगार प्रशासनाला आदेश दिल्यानंतर प्रत्येक बसमध्ये २२ याप्रमाणे पाच बसमधून या मजुरांना पाठविण्यात आले आहे. या बस मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत (मुक्ताईनगर) जाणार असून, तेथे मजुरांना सोडण्यात येईल, तर शनिवारी (ता.१६) सकाळी दोन बसमधून जवळपास ४० नागरिकांना औरंगाबादला पाठविण्यात आले असल्याचे आगार प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

आणखीनही उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार राज्यांतील अनेक नागरिक अडकून पडलेले असून त्यांच्या नोंदी, वैद्यकीय तपासणीनंतरच त्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यावेळी आगारप्रमुख दत्तात्रय काळम पाटील, शहर पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक नीता गायकवाड, मंडळ अधिकारी पद्माकर मुळाटे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेऊन मजुरांना सोडण्यात येणाऱ्या बस धुऊन, निर्जंतुकीकरण केल्या आहेत. बसमध्ये प्रत्येकाला मास्क वापरण्याची सक्तीही करण्यात आली आहे. 

पाच बसमधून शुक्रवारी मध्य प्रदेशचे मजूर पाठविण्यात आले असून, त्यांना मुक्ताईनगरपर्यंत सोडण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाचा आदेश येताच आणखी बस सोडण्याची तयारी करण्यात आली आहे. 
- डी. बी. काळम पाटील, आगारप्रमुख 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Buses left for Beed district