esakal | कार उलटून शिक्षिकेचा मृत्यू, चौघे जखमी 
sakal

बोलून बातमी शोधा

कार उलटून शिक्षिकेचा मृत्यू, चौघे जखमी 

दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात नायगाव (ता. कळंब) शिवारात बुधवारी (ता. २५) सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार शिक्षक जखमी झाले. 

कार उलटून शिक्षिकेचा मृत्यू, चौघे जखमी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिराढोण/नायगाव (जि. उस्मानाबाद) : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात उलटून एका शिक्षिकेचा मृत्यू झाला. तर चार शिक्षक जखमी झाले. ही घटना नायगाव (ता. कळंब) शिवारात बुधवारी (ता. २५) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

गंभीर जखमी झालेल्या एका शिक्षिकेला उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. अपघातातील मृत व जखमी शिक्षक शिराढोण (ता. कळंब) येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेई केंद्रीय (ओजस) शाळेतील आहे. दरम्यान, मंगळवारी वाढदिवस साजरा केलेल्या शिक्षिकेवर दुसऱ्या दिवशी काळाने घाला घातल्याने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा- हैवान पिसाळले...सतरा वर्षीय मुलगी बाळंत, तेरा वर्षांच्या मुलीवर झोपेतच झडप,..

शिराढोण येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेई केंद्रीय (ओजस) शाळेतल पाच शिक्षक मुरूड येथून शिराढोणला दररोज ये-जा करतात. बुधवारी सकाळी हे शिक्षक मुरूड येथून एका कारमधून (एमएच- २४, एएस- ४६२५) शिराढोणकडे निघाले होते. नायगाव (ता. कळंब) शिवारात आले असता एका दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात ही कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात उलटली.

हेही वाचा- कमी किंमतीत चैनीच्या वस्तु, अनेकांना २० लाखांचा गंडा

या अपघातात सहशिक्षिका ज्योती अरुण माकोडे (वय ३७) यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर कारचालक शिक्षक राजेंद्र मचाले (३८, रा. मुरूड), कांतीलाल गणगे (४०, रा. डोणजा, ता. परंडा, ह.मु. मुरूड), सहशिक्षिका मंजूषा पवार (३७) व शीतल जाधव (३३, दोघीही रा. मुरूड) हे चौघे जखमी झाले. मंजूषा पवार यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित तीन जखमींवर मुरूड येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मुख्याध्यापक सुनील अहिरे यांनी दिली.

 हेही वाचा- प्रेमप्रकरणातून मुंबईत खून, नांदेडातून अटक

एक दिवसापूर्वी साजरा केला वाढदिवस

अपघात ठार झालेल्या ज्योती माकोडे मूळ निवळी (ता. लातूर) येथील रहिवासी आहेत. सध्या त्या मुरूड येथे राहतात. मंगळवारी (ता. २५) सहशिक्षिका ज्योती माकोडे यांचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर दुसऱ्या दिवशी बुधवारी ज्योती माकोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ आल्याने विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून, या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. 

loading image