परभणीजवळ विहिरीत कोसळली कार; डॉक्टरचा मृत्यू 

file photo
file photo

परभणी : औरंगाबादहून परभणीकडे वेगाने येणाऱ्या कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका तरुण डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहराजवळील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ शनिवारी (ता.२१) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. डॉ. स. मुज्जमील स. ईसा (वय ३२) असे मृताचे नाव आहे. 

डॉ. स. मुज्जमील हे औरंगाबादहून परभणीतील दर्गा रोड परिसरात त्यांच्या सासुरवाडीला कारने (एमएच-०१, बीजी-४८८६) येत होते. पाथरी रस्त्यावरील जुने आरटीओ कार्यालयाजवळील जब्बार यांच्या ढाब्यानजीक कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ताबा सुटल्याने त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दल, ग्रामीण पोलिस व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन राबविले. कारमध्ये अडकलेल्या डॉ. स. मुज्जमील यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे फौजदार रमेश गायकवाड, पोलिस कर्मचारी युसूफ पठाण करत आहेत.  

मालेवाडी येथे साप चावल्याने बैलाचा मृत्यू 

 गंगाखेड ः तालुक्यातील मालेवाडी येथे सापाने बैलास चावा घेतल्याची घटना शनिवारी (ता.२१) घडली. यावेळी पशुवैद्यकीय दवाखान्यात औषध उपलब्ध नसल्यामुळे उपचारास विलंब झाला. यामध्ये बैल मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथील शेतकरी गजानन गंगाधर शिंदे यांच्या शेतात सोयाबीन काढून ठेवलेल्या ढिगाजवळ बैलगाडी गेली असता त्यातून अचानक आलेल्या सापाने बैलाच्या पायास चावा घेतला. शेतकरी गजानन शिंदे यांनी घटना घडताच पशुवैद्यकीय डॉक्टरला संपर्क केला. गंगाखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सर्पदंशावरील इंजेक्शन उपलब्ध नसल्याने खासगी बाजारातून इंजेक्शन उपलब्ध करावे लागले. यात बराच वेळ गेला. उपचार करूनही या बैलाचा मृत्यू झाला. 

सातेफळ, कावलगावात गुटखा जप्त 

कावलगाव ः सातेफळ व कावलगाव (ता.पूर्णा) येथे अवैधपणे गुटख्याची विक्री करणाऱ्या दोघांकडून पोलिसांनी शुक्रवारी (ता.२०) सकाळी गुटख्याचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सातेफळ (ता.पूर्णा) येथील एका पानटपरीवर गुटखा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी शुक्रवारी (ता.२०) सकाळी साडेअकरा वाजता या ठिकाणी पंचासमक्ष छापा मारला असता, त्यांना या ठिकाणी राज्यात बंदी घालण्यात आलेला गुटखा आढळून आला. पानटपरीचालक सखाराम कोंडिबा लोखंडे (वय ३५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या ठिकाणी पोलिसांना ६६० रुपयांच्या वजीर गुटख्याच्या पुड्या, ६४० रुपयांच्या गोवा, २१० रुपयांचे राज निवास असा मुद्देमाल सापडला आहे. फौजदार श्री. पंडित यांनी हा मुद्देमाल जप्त केला. तसेच कावलगाव (ता.पूर्णा) येथे बसस्थानक परिसरात यादगार पानपट्टीवर छापा मारला असतात त्या ठिकाणी शेख मुजीब शेख बाबू (वय २५) याच्याकडे २८० रुपयांचा गोवा, ९० रुपयांचा राजनिवास, २०० रुपयांचा विमल असा माल पोलिसांनी जप्त केला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com