उमरगा : मुंबईहून परतलेले वाहक आणि चालक पॉझिटिव्ह ; बसच्या प्रवासाची सुरक्षितता धोक्यात

अविनाश काळे
Saturday, 19 December 2020

उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला आहे, पण संसर्गाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी सुरक्षितता जपायला हवी. परंतु सर्वत्र त्याचा बोजवारा उडत असल्याचे चित्र दिसत आहे.

उमरगा (उस्मानाबाद) : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र तूर्त दिसत असले तरी धोका टळलेला नाही. सर्वत्र गर्दीचे चित्र दिसत असून चेहऱ्यावरचा मॉस्क  काढण्याची मानसिकता तयार झाली आहे. दरम्यान एस.टी.बसमध्येही सुरक्षितता पाळली जात नाही. मुंबईच्या 'बेस्ट' साठी वहाक, चालकांची ड्यूटी सुरु असून चार दिवसापूर्वी मुंबईहून परत आलेल्या एक वाहक, चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : परतूर येथे स्कारपीओ चालकावर केला चाकूने जीवघेणा हल्ला ; दोन अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला आहे, पण संसर्गाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी सुरक्षितता जपायला हवी. परंतु सर्वत्र त्याचा बोजवारा उडत असल्याचे चित्र दिसत आहे. बस वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशी वाढले आहेत, मात्र प्रवासादरम्यान असणारी सुरक्षितता जपली जात नाही. मुंबईच्या बेस्टसाठी संपूर्ण राज्यातील आगाराचे वाहक, चालकांना रोटेशन पद्धतीने ड्यूटी सुरू करण्यात आली आहे.

उमरगा आगारातील ३५ कर्मचारी गेल्या आठवड्यात मुंबईला गेले होते. १४ डिसेंबरला परत आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात एक वाहक व एक चालक पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी मुंबईत गेल्यावर त्यांचा तपासणीदरम्यान अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, आठव्या दिवशी परतल्यावर पॉझिटिव्ह अहवाल आला. दरम्यान सध्या मुंबईत ३५ कर्मचारी आहेत, ते परतल्यानंतर तपासणी केली जाणार आहे. शिवाय सोमवारी (ता.२१) रोटेशनमधील दुसरे ३५ कर्मचारी पाठविण्यात येणार आहेत.
 
दोन दिवसात संख्या वाढली !

मध्यंतरी १५ दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज एक, दोनवर होती. मात्र दोन दिवसात ती दुपटीने वाढत आहे. १६ डिसेंबरच्या तपासणीतील चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. सरकारी रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्यासह दोन नातेवाईक पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. नागरिकांनी गाफील न राहता कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षितता जपलीच पाहिजे, असे मत डॉ. उदय मोरे यांनी व्यक्त केले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The carrier and driver returning from Mumbai were found to be corona positive at Umarga