'साहेब, आम्हाला मदत करा हो...' केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा टाहो

राजेभाऊ मोगल
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

  • खरिपाच्या एकाही पिकाने दिली नाही साथ
  • केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी सांगितले हाल 
  • विभागीय आयुक्‍तांनी सादर केली नुकसानीची माहिती
  • अतिवृष्टीने पिकांची काढणीही करता आली नाही

औरंगाबाद - सुरवातीला दगा आणि नंतर पावसाचा अतिरेक यामुळे मोठ्या कष्टाने जगवलेली पिके अक्षरश: सडली. कर्ज काढून बियाणं आणलं, पेरणी केली आणि आता मका, सोयाबीन आणि कपाशी हातातून गेली. खरिपाच्या एकाही पिकाने साथ दिली नसल्याने आता पुढचे दिवस कसे काढायचे, असा सवाल शुक्रवारी (ता. 22) केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी केला. यावेळी झालेला खर्च, पिकांचे नुकसान या बाबी प्रामुख्याने पथकाकडून जाणून घेण्यात आल्या. 

परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची शुक्रवारी केंद्रीय पथकाने पाहणी करण्यास सुरवात केली. मराठवाड्यात दोन सदस्यांचे पथक रविवारपर्यंत (ता. 24) पाहणी करणार आहे. या पथकामध्ये डॉ. व्ही. तिरुपुगल व डॉ. के. मनोहरन यांचा समावेश आहे. शुक्रवारी सकाळी विभागीय आयुक्‍तालयात या समितीसमोर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीची माहिती विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांनी सादर केली. त्यानंतरच समिती औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी रवाना झाली.

सुरवातीला औरंगाबाद तालुक्‍यातील चौका येथे कांचनबाई वाघ यांच्या दीड एकर शेतातील मका पिकाची पाहणी केली. शेतात चिखल असल्याने कोंब फुटलेली मक्‍याची कणसे पथकास आणून दाखविली. शेतात पाणी साचलेले असल्याने पिकांची काढणीही करता आली नाही. जी काढणी केली त्या मक्‍याच्या कणसाला कोंब फुटले.

लागवडीवर झालेला खर्च आणि पिकाचे झालेले नुकसान, याची माहिती पथकाने त्यांच्याकडून घेतली. त्यानंतर हे पथक फुलंब्री तालुक्‍यातील पाल येथील कृष्णा जाधव यांच्या शेतात पाहणीसाठी गेले. यावेळी श्री. जाधव म्हणाले, उभी पिके उद्‌ध्वस्त झाली. नगदी पीक असलेली कपाशी काळवंडली. त्यामुळे नुकसान तर झालेच, आता रब्बीसाठी मशागत करण्यास पैसे कुठून आणायचे? 

यावेळी श्री. केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हिंदी भाषिक असलेल्या पथकास शेतकऱ्यांच्या भावना भाषांतरित करून सांगितल्या. भेट देण्यात येणाऱ्या शेतात हे पथक पोचण्यापूर्वीच तलाठी, तहसीलदार ठाण मांडून बसलेले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार कृष्णा कानगुले, डॉ. किशोर झाडे, आनंद गंजेवार उपस्थित होते. 

पीकविम्याबद्दल काहीतरी सांगा  

पिकांची पाहणी करताय, हे चांगलंच आहे. पण पीकविम्याचं काय झालं? जरा याचीबी माहिती द्या. सध्या त्याची माहिती कुणीच द्यायला तयार नाही. अनेक वर्षांपासून जपलेल्या आमच्या फळबागा वाया गेल्यात. त्याचे तुम्ही काय करणार आहात, असा प्रश्‍न काशीनाथ मोरे या शेतकऱ्याने पथकासमोर उभा केला. त्यावर हे पथक केंद्राचे आहे, त्यांना पिकांची माहिती करून घ्यायची आहे, अशा अडचणी आम्हाला सांगा, असे म्हणत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी त्यांची समजून काढली.

मराठवाड्यात पेरणीपासून ते पीक काढणीवेळी आलेल्या पावसापर्यंत केंद्रीय पथकास माहिती दिलेली आहे. पेरणीनंतर पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे उत्पादनात झालेली घट आणि परतीच्या पावसाने झालेले नुकसान याबाबतची इत्थंभूत माहिती पथकासमोर मांडली आहे. मी, स्वत: शेतकरी असल्यामुळे सगळ्या परिस्थितीची मला जाणीव असल्याने शेतकऱ्यांची काय व्यथा आहे, हे समजावून सांगितले. 
- सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्‍त. 

असं कसं झालं - सत्ता भाजपची, महापौर मात्र कॉंग्रेसचा

कोण म्हणाले - महापरीक्षा पोर्टल बंद करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Team Visits Drought-Hit Regions Marathwada