या सरकारला चांगली बुद्धी दे : चंद्रकांत दादांचे तुळजाभवानीला साकडे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता. 12) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : सध्याच्या राज्य सरकारला अस्तित्वात असेपर्यंत चांगले काम करण्याची सुबुद्धी द्यावी, असे साकडे आपण तुळजाभवानी मातेकडे घातले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांनी बुधवारी (ता. 12) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, देवानंद रोचकरी यांची उपस्थिती होती. 

मोठी बातमी - मुलं आणि महिलांच्या तस्करीबाबतचं धक्कादायक वास्तव, मुंबई एक नंबरवर तर पुणे...

श्री. पाटील म्हणाले, की सध्याच्या राज्य सरकारची कर्जमाफी फसवी ठरलेली आहे. स्थगिती देणारे सरकार सध्याचे आहे. सरकार पाडण्यासाठी मी प्रार्थना करीत नाही. सध्याच्या सरकारमध्ये समन्वय नाही. नवी दिल्लीतील भाजपच्या अपयशाबाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले, की भाजपला दिल्लीमध्ये 39 टक्के मते मिळाली. तर कॉंग्रेसला चार टक्के मिळाली. एकटा भाजप विरोधकांशी लढण्यास तयार आहे.

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला 53 टक्के मते मिळाली आहेत. मागील वेळी 54 टक्के मते मिळाली होती, असे ते म्हणाले. नाईट लाईफलाईन या सरकारच्या उपक्रमाबाबत त्यांनी टीका केली. ए नाईन बंगल्याची दुरूस्ती करण्याबाबत ते म्हणाले, की आमच्या सरकारच्या काळात पाच वर्षात रंग लावला नाही. हे सरकार बंगल्याची कामे कशासाठी काढत आहे, असा सवाल त्यांनी केला. या वेळी श्री. पाटील यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

थोरातांना मंदी कळते का? 

मोदींच्या काळात जागतिक मंदी उठली आणि भारतात आली, असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले होते. त्यावरून बाळासाहेब थोरात यांना मंदी कळते का, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मंदी काय एका देशातून दुसऱ्या देशात येत नाही. ती जगात असते. त्यामुळे 
बाळासाहेब थोरात यांनी मंदी काय असते हे अगोदर नीट समजून घ्यावे, असे श्री. पाटील म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil In Tuljapur Osmanabad News