परभणीतून चरस, गांजा व गावठी पिस्टल जप्त, तिघांना अटक

गणेश पांडे 
Tuesday, 23 February 2021

शहरातील साखला प्लॉट भागातील एका ठिकाणावरून पोलिसांनी ३११ ग्रॅम चरस, पाचशे ग्रॅम गांजा, दोन गावठी पिस्टलसह १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.

परभणी ः शहरातील साखला प्लॉट भागातील एका ठिकाणावरून पोलिसांनी ३११ ग्रॅम चरस, पाचशे ग्रॅम गांजा, दोन गावठी पिस्टलसह १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल सहा लाख ४१ हजार आठशेचा मुद्देमाल हस्तगत केला. 

माहितीच्या आधारे छापा 
शहरातील साखला प्लॉट परिसरातील रेल्वेगेट जवळ आरोपी शेख सोनू उर्फ शेख अमीर शेख ताहेर हा चरस, गांजा अश्या घातक पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याचबरोबर हा इसम गावठी पिस्टल ही वापरतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. 

घरासह चारचाकी वाहनाची झडती 
माहितीवरून त्याच्या अड्ड्यावर तहसिलदार डॉ.संजय बिरादार, सहायक पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता.२३) सायंकाळी छापा मारला. तेव्हा पोलिसांनी त्याच्या घरातील बैठकीची झडती घेतली असता त्यांना त्या ठिकाणावरून चरस, गांजा सापडला. पोलिसांनी घरासह त्याच्या चारचाकी वाहनाची झडती घेतली असता त्यात एक गावठी पिस्टल व १३ जिवंत काडतुसे आढळून आली. घराच्या समोर लावण्यात आलेल्या बुलेट गाडीच्या डिक्कीतूनही पोलिसांना एक गावठी पिस्टल सापडले. पोलिसांनी तातडीने शेख सोनु यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याचे अन्य दोन साथीदार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिस पथकाने या दोघांनीही तातडीने ताब्यात घेतले. या तिघांकडून पोलिसांनी तब्बल सहा लाख ४१ हजार आठशेचा मुद्देमाल हस्तगत केला.

हेही वाचा - कोरोनाचे सावट : परभणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर रस्त्यावर उतरले

यांनी केली कारवाई 

ही कारवाई पोलिस अधिक्षक जयंत मीना, अप्पर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, गुलाब बाचेवाड, फौजदार चंद्रकांत पवार, संतोष सिरसेवाड, विश्वास खोले, साईनाथ पुयड, पोलिस अमलदार सुग्रीव केंद्रे, हनुमंत जक्केवाड, निलेश भुजबळ, मधुकर चट्टे, बालासाहेब तुपसुंदरे, बबन शिंदे, शंकर गायकवाड, अझहर पटेल, हरिचंद्र खुपसे, दिलावर खान पठाण, दीपक मुदीराज, यशवंत वाघमारे, सय्यद मोईन, शेख अझहर जाफर, संतोष सानप, संजय घुगे, छगन सोनवणे, अरूण कांबळे, विष्णू भिसे, आशा सावंत, उमा पाटील यांनी केली. 

हेही वाचा - कोरोना नियमाचे पालन न करणाऱ्या लाँन्स, मंगल कार्यालयावर कारवाई करा- जिल्हाधिकारी

विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून कौतूक 
परभणी शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाई बद्दल नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी तातडीने परभणी येथे येवून पोलिस अधिक्षकांसह सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charas, cannabis and village pistol seized from Parbhani, three arrested parbhani crime news