लाच मागितल्याप्रकरणी चाकूरच्या सहायक पोलिस निरीक्षकाविरुध्द गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

शेतीच्या प्रकरणात दिलेल्या तक्रारी अर्जावर कारवाई करण्यासाठी पन्नास हजार रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बालाजी मारोती तोटेवाड याच्याविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता.१४) रात्री गुन्हा दाखल केला आहे.

लातूर : शेतीच्या प्रकरणात दिलेल्या तक्रारी अर्जावर कारवाई करण्यासाठी पन्नास हजार रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बालाजी मारोती तोटेवाड याच्याविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता.१४) रात्री गुन्हा दाखल केला आहे. नूतन पोलिस अधीक्षक रूजु होताच पोलीस अधिकाऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे सलामी मिळाली आहे.

नळेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या धनश्री राजेश अर्जुने यांचे सुगाव गावात शेत असून त्यांनी तुकाराम जयराम अर्जुने व इतर व्यक्तींच्या विरोधात शेतातील भांडणाच्या कारणावरून चाकूर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. तसेच तुकाराम अर्जुने यांनीही धनश्री अर्जुने यांच्याविरूध्द तक्रार दिली होती.

चाकूरात वादळी पाऊस : घरणी प्रकल्प भरला; ऊसही झोपला, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ! 

अर्जानुसार कारवाई करण्यासाठी व तक्रारी अर्जानुसार मदत करतो म्हणून सहायक पोलिस निरीक्षक बालाजी तोटेवाड यांनी एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती पन्नास हजार रूपये लाचेची रक्कम घेण्याचे मान्य करून लाचेची रक्कम घेण्यास जाणून बुजुन टाळाटाळ केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून चाकूर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक बालाजी तोटेवाड याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charge File Against Chakur Assistant Police Inspector For Bribe Case