Aurangabad-Municipal
Aurangabad-Municipal

सेंट्रल झू ॲथॉरिटीलाही महापालिकेचे ‘उल्लू बनाविंग’

औरंगाबाद - प्राणिसंग्रहालयात वाघ ठेवण्यासाठी किमान २५ एकर जागेची आवश्‍यकता आहे; मात्र महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची जागा केवळ १६ एकर असताना, आम्ही मास्टर प्लॅन राबवित असल्याचे सांगत वाघ नियमबाह्य ठेवून महापालिकेने सेंट्रल झू ॲथॉरिटीला उल्लू बनविल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या दिल्लीतील सुनावणीनंतरही प्राणिसंग्रहालयासाठी सेंट्रल झू ॲथॉरिटीने हिरवा कंदील दाखविलेला नाही.

जागेची अडचण, चुकीच्या पद्धतीने ठेवण्यात आलेले प्राणी, यासह ३५ आक्षेप घेत सेंट्रल झू ॲथॉरिटीने महापालिकेला सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय बंद का करण्यात येऊ नये, अशी नोटीस दोन आठवड्यांपूर्वी बजावली होती. त्यावर ता. २४ मेरोजी दिल्लीत सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यानुसार प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी महापालिकेतर्फे बाजू मांडली. तत्पूर्वी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्राणिसंग्रहालयात तातडीने कामे सुरू करण्यात येतील, असे सांगितले होते. नाईकवाडे यांनी अत्यावश्‍यक कामे सुरू करण्यात आली आहेत, यंदाच्या बजेटमध्ये एक कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने केली आहे, असे स्पष्ट केले. या सुनावणीनंतरही नोटीस मागे घेण्यात आल्याचे महापालिकेला स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे प्राणिसंग्रहालयावरील टांगती तलवार कायम आहे. दरम्यान, दिल्लीहून शहरात परतल्यानंतर नाईकवाडे यांनी सांगितले, की प्राणिसंग्रहालयात वाघ ठेवण्यासाठी किमान २५ एकर जागेची गरज आहे. सध्या १६ एकर जागेत असलेल्या प्राणिसंग्रहालयाचा मास्टर प्लॅननुसार विस्तार करण्यात येत असल्याचे २०१४ मध्ये महापालिकेने सेंट्रल झू ॲथॉरिटीला कळविले होते.

मात्र, अद्याप मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. परवाना नूतनीकरण झालेला नसतानाही सध्या प्राणिसंग्रहालय चालविण्यात येत आहे. त्यात आता वाघही नियमबाह्य ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.

पाच लाख पर्यटकांनी दिली भेट 
सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालय मराठवाड्यातील एकमेव आहे. गतवर्षी पाच लाख १८ हजार पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली आहे. त्यातून महापालिकेला दोन कोटी पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com