रसायनाचा टॅंकर खाक, चालकाचा मृत्यू, बीडच्या मांजरसुंबा घाटात अपघातानंतर स्फोट, एक जण गंभीर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

आगीचा भडका अचानक उडाल्यामुळे एकाचा गाडीतच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. विशाखापट्टनमकडून एक टॅंकर (जीजे- १६, एव्ही- ६१७७) गुजरात राज्यात जात होता. टॅंकर मांजरसुंबा घाटात येताच अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटी झाला.

बीड - रसायन द्रव घेऊन जाणाऱ्या टॅंकरचा अपघातानंतर स्फोट होऊन लागलेल्या आगीत टॅंकरसह चालक जळून खाक झाला. बुधवारी (ता. २०) सकाळी घडलेल्या घटनेत अन्य एकजण गंभीर भाजला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सत्ते कुमार (रा. उन्नवाल, खलीलाबाद, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे. विनोदप्रसाद गौतम (रा. बनारस, उत्तर प्रदेश) असे जखमीचे नाव आहे.

 नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस व अग्निशमन दलाने धाव घेतली; मात्र आगीचा भडका अचानक उडाल्यामुळे एकाचा गाडीतच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. विशाखापट्टनमकडून एक टॅंकर (जीजे- १६, एव्ही- ६१७७) गुजरात राज्यात जात होता. टॅंकर मांजरसुंबा घाटात येताच अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटी झाला. रसायन असल्यामुळे टँकरने पेट घेतला. यावेळी मोठी आग लागली होती.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

यावेळी परिसरातील नागरिकांनी तत्काळ टँकरकडे धाव घेतली; मात्र आगीने रौद्र रूप धारण केले होते. जखमीला दवाखान्यात पाठविण्यात आले; तसेच पोलिसांना व अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी व अग्निशमनच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली; तसचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घाटातील वाहतूक सुरळीत केली. टँकरने पेट घेतल्यामुळे चालकाला बाहेर पडता आले. त्यामुळे सत्ते कुमार याचाही भाजून मृत्यू झाला. तर जखमी विनोदप्रसाद गौतम याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची नोंद बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस ठाण्याचे प्रमुख सपोनि सुजित बडे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chemical tanker ash, driver killed, blast after accident in Beed's Manjarsumba ghat, one seriously injured